SHARE MARKET TODAY नवी दिल्ली : भारताचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल सादर केल्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. 2 फेब्रुवारी म्हणजेच आज शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. सुरुवातीच्या शेअर बाजारातील घसरणीनंतर दुपारच्या सत्रात यात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स अखेर 943.52 अंकांच्या तेजीसह 1.17 टक्क्यांनी वाढून 81666.46 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 262.95 अंकांनी वाढून 1.06 टक्क्यांच्या तेजीसह 25088.40 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात सुरुवातीला संमिश्र जागतिक संकेतामुळं शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदार अर्थसकंल्पातील घोषणा समजून घेण्याच्या प्रक्रियेमुळं सतर्क झाले आहेत. गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास वाढला आणि दुपारनंतर खरेदीचं सत्र पाहायला मिळालं होतं.
शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर मध्ये देखील चांगली तेजी दिसून आली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढला. निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वाढला. सेक्टोरल निर्देशांक एफएमसीजी, मेटल, ऑईल अँड गॅस, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल्टी सेक्टरच्या शेअरमध्ये 1 आणि 2 टक्क्यांची तेजी दिसून आली. आयटी निर्देशांकात मात्र 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 4.63 लाख कोटींनी वाढलं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 450.61 लाख कोटी रुपयांवरुन 455.23 लाख कोटींवर पोहोचलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती 4.63 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
सेन्सेक्सवर 30 पैकी 25 शेअरमध्ये तेजी दिसून आली. पॉवर ग्रीड, अदानी पोर्टस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीज,महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.एक्सिस बँक, इन्फोसिस, टीसीएस, ट्रेंट, टायटनच्या शेअरमध्ये 1.85 टक्क्यांची घसरण झाली.
बीएसईवर तेजीसह बंद झालेल्या शेअरची संख्या अधिक राहिली. 2037 शेअर तेजीसह बंद झाले. त्याचवेळी 2220 शेअरमध्ये घसरण झाली. 171 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. 76 शेअरनं उच्चांक गाठला आहे. तर,360 शेअरनं 52 आठवड्यांचा नीचांक गाठला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)