बेपत्ता गृहस्थ दहा वर्षांनी घरी
ऑपरेशन मुस्कानअंतर्गत दिल्लीतून ताब्यात
वाडा, ता. २ (बातमीदार) ः वाडा येथील प्रवीण पवार (वय ३९) बेपत्ता झाल्याची तक्रार वाडा पोलिस ठाण्यात दाखल होती. तब्बल दहा वर्षांनंतर वाडा पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ऑपरेशन मुस्कानअंतर्गत दिल्ली येथून ताब्यात घेऊन पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहे.
हरवलेली बालके, महिलांचा शोध घेण्यासाठी पालघर पोलिस दलाकडून ऑपरेशन मुस्कान-१४ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर पोलिस दलातील दाखल असलेल्या हरवलेली मुले, महिलांबाबतच्या दाखल गुन्ह्यांचा शोध नव्याने पथके नेमून करण्यात येत आहे. प्रवीण पवार यांच्याबाबत २०१६ मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक वनवे यांच्यासह त्यांच्या पथकाने माहिती घेऊन तांत्रिक तपास, गोपनीय माहितीच्या आधारे दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे.