प्रशासकीय कारभार एका छताखाली
esakal February 03, 2026 08:45 AM

प्रशासकीय कारभार एका छताखाली
विक्रमगडमधील इमारतीसाठी नवीन प्रस्ताव
विक्रमगड, ता. २ (बातमीदार) ः तालुक्याच्या विकासासाठी शासनाने महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये एकच ठिकाणी सुरू करण्याचा प्रस्ताव आखला आहे. याअंतर्गत नवीन अंदाजपत्रक सादर केले जाणार असून लवकरच प्रशासकीय कारभार एका छताखाली येणार आहे.
विक्रमगड तालुक्यातील तहसीलदार, दुय्यम निबंधक, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, भूमिअभिलेख, उपकोषागार अधिकारी, नगर पंचायत ही सर्व कार्यालये एकच प्रशासकीय इमारतीत करण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे आवश्यक निधीसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या अहवालानुसार ढोबळ अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता त्यामध्ये सुधारणा करून नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे भविष्यात सर्व कार्यालये एकच ठिकाणी येणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.
---------------------------
मोजणी प्रक्रिया पूर्ण
- विक्रमगड-जव्हार रस्त्यालगत दिवेकर वाडीसमोर विक्रमगड येथील जलसंपदा विभागाचे देहर्जे प्रकल्प वसाहतीत गट नंबर २७, २३ क, २८, २९ मधील गट नंबर २७ मधून दोन हेक्टर जमीन प्रशासकीय इमारतीसाठी हस्तांतरण करण्यात येणार आहे.
- जमीन प्रशासकीय इमारतीसाठी तहसीलदार विक्रमगड यांच्या नावे होऊन जागेची मोजणी प्रक्रिया झाली आहे. त्यानंतर सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन निधी उपलब्ध झाल्यानंतर इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.