मनखेड: सरकारने मोठा गाजावाजा करून राबविलेल्या जलजीवन योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. दिसायला कामे पूर्ण झालेली असली तरी त्यातून जनतेपर्यत अजून पाणी पोचलेलेच नाही हे मात्र भीषण वास्तव आहे. असे असताना या कामांची बिले मात्र पूर्ण निघालेली आहेत.
मग अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे ही बिले दिली, कामे अपूर्ण असताना हे कसे काय घडले याचबरोबर जनतेला पाणी का मिळालेले नाही याचे उत्तर जनता मागत आहे. तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोंघाणे ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या जांभूळपाडा दा. या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीयोजनेचे काम झालेले दाखवून दोन वर्षे झाली, पण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही गावाला पाणी मिळाले नाही.
ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही ना सरपंच, ना ग्रामसेवक याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एक ते दीड किलोमीटरवरून डोक्यावर हंडा घेऊन महिलांना पाणी आणावे लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी, त्याला ब्लॅकलिस्टला टाकावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
प्रशासनाने लक्ष घालून आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकून सरपंच किंवा सदस्यांना ग्रामपंचायत आवारात फिरकू देणार नाही असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलेला आहे.
ग्रामसभांमध्ये चर्चा; पण...
सध्या एक ते दीड किलोमीटरवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत असल्याने महिला- पुरुषांमध्ये भांडणे होत आहेत. युवकांनी अनेकदा ग्रामसभांमध्ये हा प्रश्न मांडला, मात्र सरपंच, ग्रामसेवकांनी त्याला फारसे गांभिर्याने घेतले नाही, त्यामुळे नेमके पाणी मुरते कुठे असा प्रश्न उपस्थित होतो.
काटेवाडी ते मंत्रालय... नेतृत्वासाठी तयार झालेलं व्यक्तिमत्त्व; सामाजिक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक प्रवासग्रामसेवक, सरपंचांना हे भीषण वास्तव वारंवार सांगूनही ते लक्ष द्यायला तयार नाही. ठेकेदार तर कुणालाच जुमानत नाही. यावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा टाळेबंदी आंदोलन करून त्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही.
- महिंद्र पाडवी, स्थानिक ग्रामस्थ, जांभूळपाडा
पाणी लांबून आणावे लागत असल्याने महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. डोक्यावर हंडा घेऊन एक ते दीड किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. मग लाखो रुपये खर्च केलेली ही योजना कायम कामाची. कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
- वंदना भोये, स्थानिक महिला, जांभूळपाडा दा.