केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन क्षेत्रावर भर
esakal February 03, 2026 12:45 PM

swt27.jpg
21513
नीरज देसाई

केंद्रीय अर्थसंकल्पात
उत्पादन क्षेत्रावर भर
नीरज देसाई ः पायाभूत सुविधांवर जोर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः केंद्रीय अर्थसंकल्प प्रामुख्याने देशाला वेगाने विकसित भारताच्या दिशेने नेणारा आहे. यात बायो फार्मा, आयटी, डेटा सेंटर, पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर आणि खनिज आदी क्षेत्रांना देशात उज्ज्वल भविष्य आहे, असे मत क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांनी व्यक्त केले.
केंद्राचा हा अर्थसंकल्प भारतातील उत्पादन क्षेत्राचा विस्तार करणे, आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यावर भर देणारा आहे. विशेषतः टियर २ आणि ३ शहरे ही देशाच्या प्रगतीची ‘ग्रोथ इंजिन्स’ आहेत, यावर या अर्थसंकल्पात दिलेला जोर महत्त्वाचा आहे. महामार्ग, मेट्रो, लॉजिस्टिक्स कॉरिडॉर, रेल्वे आणि शहरी पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीमुळे ‘कनेक्टिव्हिटी’ सुधारून नवीन विकासाचे मार्ग खुले होतील आणि दीर्घकालीन शहरी विकासाला पाठिंबा मिळेल, अशी आशा क्रेडाईने व्यक्त केली आहे. क्रेडाईचा विश्वास आहे की, परवडणारी घरे ही आर्थिक पायाभूत सुविधांचा भाग आहेत. समावेशक आणि शाश्वत शहरी वाढ निश्चित करण्यासाठी आगामी काळात परवडणाऱ्या घरांच्या धोरणाकडे अधिक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा श्री. देसाई यांनी यावेळी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.