भातसा उजवा कालवा पुन्हा फुटला
esakal February 03, 2026 01:45 PM

भातसा कालवा पुन्हा फुटला
दहागाव-कासणे यादरम्यान भराव खचला; हजारो लिटर पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान
शहापूर, ता. २ (वार्ताहर) : तालुक्यातील भातसा धरणाचा उजवा कालवा पुन्हा एकदा फुटल्याने शेतकऱ्यांचे दुबार शेतीचे स्वप्न धोक्यात आले आहे. धरणालगत ३८ किमी अंतरावर दहागाव आणि कासणे यादरम्यान कालव्याचा भराव खचल्याने हजारो लिटर पाणी थेट शेतात घुसले. यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले असून, दुरुस्तीसाठी पाण्याचा पुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे.

अतिवृष्टीने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर आता कालवा फुटल्याचा दुहेरी आघात होत आहे. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात कालवा फुटण्याची ही तिसरी घटना आहे. दरवर्षी १५ डिसेंबरला सिंचनासाठी पाणी सुटते, मात्र यंदा दुरुस्तीच्या नावाखाली ते १ जानेवारीला सोडले गेले. कालव्याची क्षमता ९५० क्युसेक असताना केवळ २०० क्युसेक वेगाने पाणी सोडले होते, तरीही कालव्याचा भराव खचल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

३५ वर्षे जुन्या असलेल्या या कालव्याला उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी पोखरले आहे. मात्र, पाटबंधारे विभाग कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी केवळ वरवरची ‘मलमपट्टी’ करत असल्याचा आरोप संतापलेले शेतकरी करत आहेत. आवरे गावाजवळ झालेल्या घटनेनंतरही प्रशासनाला जाग न आल्याने आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

पाणी बंद होण्याचे ‘अजब’ कारण
दरम्यान, ३८ व्या किमीवरील कालव्याचे गेट कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बंद केल्यामुळे पाण्याचा दाब वाढला आणि भराव खचला, असे प्राथमिक स्पष्टीकरण भातसा कालवा विभागाने दिले आहे. मात्र, या तांत्रिक गोंधळात बळी मात्र सामान्य शेतकऱ्याचा जात आहे. त्यामुळे भाजीपाला आणि भात पिकाला पाण्याची नितांत गरज असताना वारंवार पाणी बंद होणे परवडणारे नाही. प्रशासनाने आता तरी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.