रणरागिणी, शूरवीर संघांची बाजी
प्रभादेवी, ता. २ (बातमीदार) : यंग प्रभादेवी प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेच्या महिला गटात रणरागिणी संघाने आणि पुरुष गटात शूरवीर संघाने बाजी मारली. यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाने प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदानात क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. स्पर्धेत पुरुष गटात आठ संघ, तर महिला गटात तीन संघ सहभागी झाले होते.
पुरुषांत उत्कृष्ट फलंदाज म्हणून रेहान परब, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राजेश घाग, उत्कृष्ट खेळाडू म्हणून चिंतामणी म्हाडगुत, उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू म्हणून ऋषीकेश कोरगावकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महिलांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून जान्हवी कदम, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्योती देसाई, उत्कृष्ट खेळाडू म्हणून रक्षा बंडबे आणि उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू म्हणून साक्षी घोसाळकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघांना रोख रक्कम, चषक आणि महाराष्ट्र बाजार पेठेचे संस्थापक डॉ. कौतिक दांडगे यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली.