मुलुंड वाहतूक पोलिसांची धडक दंडात्मक कारवाई
मुलुंड, ता. २ फेब्रुवारी (बातमीदार) : बेशिस्त वाहनचालक आणि दुचाकीस्वारांवर आळा घालण्यासाठी मुलुंड वाहतूक पोलिसांनी जोरदार दंडात्मक मोहीम राबवली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मुलुंड वाहतूक पोलिसांनी १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. यादरम्यान, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, चुकीच्या ठिकाणी वाहन उभे करणे, पदपथावरून दुचाकी व चारचाकी वाहने चालवणे, निषिद्ध ठिकाणी पार्किंग करणे, धोकादायक ओव्हरटेक करणे असे विविध प्रकारचे नियमभंग आढळून आले.
विशेषतः प्रवाशांना इच्छित ठिकाणी नेण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकांवरही वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. भाडे नाकारणे हा नियमभंग मानून अशा रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय, रस्त्यावर वाहतूक शिस्त न पाळणाऱ्या दुचाकीस्वार व वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड ठोठावण्यात आला. या एक महिन्याच्या कालावधीत मुलुंड वाहतूक पोलिसांनी एकूण ६,५२२ वाहनचालकांवर कारवाई करत १४ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती मुलुंड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तांबे यांनी दिली. मुलुंड वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र दिसत आहे.