Mandar Shinde on Brother Kedar Shinde: मराठी मनोरंजनसृष्टीत केदार शिंदे (Kedar Shinde)हे नाव नवं नाही. अनेक लोकप्रिय चित्रपटांचा दिग्दर्शक असणारा केदार शिंदे याने अनेक सुप्रसिद्ध चित्रपट दिले. शाहीर साबळेंच्या घरी वाढलेल्या केदारला कलेचं, संगीताचं बाळकडूच मिळालेलं. मात्र फार कमी जणांना माहित आहे की त्यांचे सख्खे भाऊ मंदार शिंदे(Mandar Shinde)हे देखील एकेकाळी कलाविश्वात सक्रिय होते. दिग्दर्शनातही त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र करिअरच्या एका चांगल्या टप्प्यावर असतानाच मंदार शिंदे यांच्या आयुष्याने अनपेक्षित वळण घेतलं. ड्रायव्हिंग करून कुटुंब चालवण्याची वेळ त्यांच्यावर आली. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. केदार शिंदेला मी त्याचा सख्खा भाऊ आहे हे पाच सात वर्ष माहितीच नव्हतं असेही त्यांनी सांगितले.
मंदार शिंदे हे सुप्रसिद्ध शाहीर साबळे यांचे नातू आहेत. कधीकाळी मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेले दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे मंदार शिंदे यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे. ते म्हणाले," लहानपणापासूनच आजोबांच्या घरी माझं जाणं येणं होतं. केदार दादा हा लहानपणापासून शाहिरांच्याच घरी राहिला. जन्माच्या दहा-बारा दिवसांनीच त्याला तिकडे पाठवलं होतं. मी माझ्या आईच्या घरी काळाचौकीला म्हणजे अभ्युदयनगरमध्ये जन्माला आलो. तिथेच वाढलो. या घरात असताना त्या घराविषयीची ओढ होती. दररोज आई मला बाबांकडे परळ विलेजला त्यांचे आंबेकरनगर सोसायटी तर त्यांच्या घरी घेऊन जायची. केदार दादाही तिथे असायचा. आम्ही दोघेही शिकायला वेगवेगळ्या शाळांमध्ये होतो. तो आर.एम.भट मध्ये होता तर मी दादरच्या किंग जॉर्ज स्कूलमध्ये शिकलो. आम्हाला जवळजवळ पाच सात वर्ष माहितच नव्हतो की आम्ही एकमेकांचे सख्खे भाऊ आहोत. याचं कारण काय तर त्याचं सगळं वलय वेगळं. मी माझ्या विश्वात. साधारण पाच-सात वर्षानंतर केदार दादाला कळलं की ही माझी आई आहे. तेव्हा त्याला कळलं की मी त्याचा सख्खा भाऊ आहे. आमच्यात कायम एक अंतर होतं. कारण आम्ही राहायला वेगवेगळ्या ठिकाणी होतो. आमच्या शाळा वेगवेगळ्या होत्या.
कलागुणांबद्दल म्हणाल तर, शाहिरांच्याच घरी वाढल्यामुळे त्याला संपूर्ण कोर्स मिळाला. मी कधी कधी जाऊन येऊन असल्यामुळे कानावर सूर पडत होते. त्यात माझा गळा थोडा बरा होता. मी गायचो गुणगुणायचो. शाळेतही अनेक ऍक्टिव्हिटीमध्ये मी भाग घ्यायचो. गाण्याच्या स्पर्धांमध्ये जायचो. सुदैवाने मी तिथे पहिला नंबर मारायचो. असं मंदार शिंदे यांनी सांगितलं.