मंचर, ता. ७ : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द येथील मतदान केंद्राचे संपूर्ण संचालन महिला कर्मचाऱ्यांनी करून आदर्श निर्माण केला. या केंद्राला निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले होते, जे मतदारांसाठी विशेष आकर्षण ठरले.
केंद्र क्रमांक १३/२४ येथे पूर्णतः महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. केंद्राचे प्रवेशद्वार रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आले होते. तर परिसरात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. संपूर्ण मतदान केंद्र गुलाबी फुग्यांनी सजवले असल्याने उत्साही वातावरण होते.
या केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून सायली कुलकर्णी, तर मतदान अधिकारी म्हणून वैशाली काळे, स्वाती भिटे व स्मिता लांडे यांनी काम पाहिले. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे व प्रभारी तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी मार्गदर्शन केले.
मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. लोकशाही बळकटीसाठी प्रोत्साहन देणारे घोषवाक्ये केंद्रावर लावण्यात आली होती. तसेच केंद्राबाहेर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. महिला मतदारांचे स्वागत करण्यासाठी महिला आशा सेविकांची विशेष नेमणूक करण्यात आली होती.
या उपक्रमासाठी स्वीप नोडल अधिकारी सुनील भेके, नारायण गोरे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटडे, विजय वळसे, विनायक राऊत, सुरेश रोंगटे, मंगेश जावळे, काशिनाथ घोंगडे व सचिन तोडकर यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उभारण्यात आलेले ‘सखी मतदान केंद्र’ आदर्श ठरले असून भविष्यातील निवडणुकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.