रेल्वे पोलिस वसाहत जर्जर अवस्थेत
पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नींची आमदार पराग शहा यांच्याकडे धाव
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्व येथील सुमारे ३५ एकर परिसरात वसलेली १९६८ मध्ये बांधण्यात आलेली जुनी रेल्वे पोलिस वसाहत सध्या अत्यंत जर्जर अवस्थेत आहे. पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना धोकादायक परिस्थितीत राहावे लागत आहे. या गंभीर समस्येबाबत पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी स्थानिक आमदार पराग शहा यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
वरळी व नायगाव येथील पोलिस वसाहतींच्या धर्तीवर याच ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देण्यात यावीत, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. निवडणुका संपल्यानंतर बाधित रहिवाशांनी आमदार शहा यांची भेट घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. यासंदर्भात आमदार पराग शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
महापालिकेने मे २०२४ मध्ये या वसाहतीतील १७ इमारतींना नोटीस बजावून त्या जर्जर घोषित केल्या आहेत. इमारतींचे सिमेंट, लोखंडी सळई व पिलर पूर्णतः खराब झाल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या वसाहतीत एकूण २४ इमारती असून, त्यापैकी सात इमारती अतिजर्जर झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. त्या इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. १९६८ मध्ये बांधण्यात आलेल्या इमारत क्रमांक एक ते सात पाडण्यात आल्या असून, १९८४ मध्ये उभारलेल्या इमारत क्रमांक आठ ते २४ सध्या पूर्णतः जर्जर अवस्थेत आहेत.
या समस्येबाबत पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नी तसेच महाराष्ट्र पोलिस बॉइज असोसिएशनने अनेक वेळा शासनाकडे लेखी मागण्या केल्या आहेत; मात्र अद्याप कोणताही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने पोलिस कर्मचारी चिंतेत आहेत. त्यामुळे वरळी व नायगावप्रमाणे याच जागेवर हक्काची घरे देण्यात यावीत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या वेळी महाराष्ट्र पोलिस बॉइज असोसिएशनचे मुंबई संघटक सुशील जंगम यांनी सांगितले, की आमची कॉलनी पूर्णतः जर्जर झाली आहे. आम्ही अनेक वेळा सरकार व प्रशासनाकडे विनंती केली आहे. आता स्थानिक आमदार पराग शहा यांना निवेदन देऊन या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.