संशोधन कौशल्यांना नवी दिशा
मुंबई विद्यापीठात तीन दिवसीय कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत संशोधन अधिक वास्तववादी, विश्वासार्ह आणि धोरणनिर्मितीस उपयुक्त ठरावे, या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर इन पॉलिटिकल इकॉनॉमी अंतर्गत ‘प्राथमिक सर्वेक्षण तंत्र आणि त्यांचे उपयोग’ या विषयावर तीनदिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली.
संशोधकांची प्राथमिक माहिती संकलनाची क्षमता वाढविणे, सूक्ष्म पातळीवरील क्षेत्रीय अभ्यास अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यास सक्षम करणे, नमुना निवड (सॅम्पलिंग डिझाईन) अधिक अचूक बनविणे तसेच माहिती संकलन, विश्लेषण व सादरीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाधारित साधनांचा प्रभावी वापर शिकवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. केवळ दुय्यम माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभवातून मिळणाऱ्या माहितीचे महत्त्व या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.
आयजीआयडीआर, एमआयडीएस आणि आयआयपीएस येथील तज्ज्ञ संसाधन व्यक्तींनी विविध सत्रांतून प्राथमिक सर्वेक्षण तंत्र, गुणात्मक व मात्रात्मक संशोधन पद्धती, क्षेत्रीय सर्वेक्षणातील नैतिकता तसेच डेटा विश्लेषण व सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. सुब्रत मुखर्जी (आरबीआय चेअर प्राध्यापक) यांनी सत्रांचे प्रभावी संचालन करत सहभागींच्या संशोधनाशी संबंधित प्रश्नांचे निरसन केले. समारोपप्रसंगी प्रा. मनीषा करणे यांनी प्रा. सुब्रत मुखर्जी व सहभागींचे अभिनंदन केले. प्राथमिक माहिती आणि गुणात्मक संशोधनामुळे विद्यमान ज्ञानसाठा अधिक समृद्ध होतो, असे नमूद करत संशोधन कौशल्य वृद्धीसाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विचारांची देवाणघेवाण
प्रशिक्षण कार्यक्रमात आयआयटी बॉम्बे, जामिया मिलिया इस्लामिया, एनजीएम कॉलेज (पोलाची, तामिळनाडू), सौराष्ट्र विद्यापीठ (राजकोट), सोलएस सीएसआर कन्सल्टन्सी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्न व स्वायत्त महाविद्यालयांतील पीएच.डी. संशोधक, तरुण संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध संस्थांतील संशोधक एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण आणि शैक्षणिक सहकार्याला चालना मिळाली.