नाशिक: नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळात खळबळ उडाली आहे. विश्वस्त मंदार जानोरकर यांना विश्वस्त पदावरून निष्कासित करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ६) झालेल्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, हा आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न असून याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे जानोरकर यांनी स्पष्ट केले आहे.
नेमके प्रकरण काय?
२०२० ते २०२५ या कालावधीसाठी पुजारी विश्वस्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असताना हा वाद उद्भवला. नियमानुसार, एका व्यक्तीला दोन टर्मपेक्षा जास्त काळ विश्वस्त पदावर राहता येत नाही. असे असतानाही काही जुन्या विश्वस्तांनी पुन्हा स्वतःची नावे सुचवली होती. संस्थानने जानोरकर यांना ‘रिपोर्टिंग ट्रस्टी’ म्हणून अधिकृत केले होते. त्यामुळे त्यांनी या नावांच्या फेरफाराबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयात योग्य कायदेशीर प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र, जानोरकर यांनी फेरफार अर्ज दाखल करण्यास टाळाटाळ केली.
परिणामी, दोन टर्म पूर्ण केलेल्या विश्वस्तांची नावे परस्पर मंजूर करून घेण्यात आली. या प्रकरणातील निकालामुळे संस्थानचे नुकसान झाल्याचे विश्वस्त मंडळाचे म्हणणे आहे. या निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात ‘रिव्हिजन अर्ज’ दाखल करण्याच्या निर्णयावेळीही जानोरकर यांनी सहकार्य केले नाही, असा आरोप संस्थानने केला आहे. अखेर तत्कालीन अध्यक्षांनी व्यवस्थापकांना अधिकार देऊन याचिका दाखल केली, ज्याचा निकाल १२ जानेवारी २०२६ रोजी संस्थानच्या बाजूने लागला.
विश्वस्त मंडळाने जानोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शुक्रवारी झालेल्या बैठकीत जानोरकर यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे मत सर्व विश्वस्तांनी नोंदवले. जानोरकर यांनी त्रयस्थ व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारांचा गैरवापर केला आणि संस्थानचा विश्वासघात केला, असे ताशेरे ओढत त्यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कलम ४१ (ड) अन्वये बडतर्फ करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
Bhimashankar Devotees Update : महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशजोपर्यंत या कारवाईचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांना संस्थानच्या कोणत्याही कामकाजात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या बैठकीस संस्थानचे अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त उपस्थित होते.
न्यायालयात दाद मागणार : मंदार जानोरकर
या प्रकरणावर आपली बाजू मांडताना मंदार जानोरकर म्हणाले, की ही तीन वर्षांपूर्वीची घटना असून, यासाठी तत्कालीन विश्वस्त मंडळ जबाबदार आहे. मला मानसिक त्रास देण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. संस्थानच्या या निर्णयाविरोधात मी न्यायालयात दाद मागेन.