वसईचा वैद्यकीय विद्यार्थी ठरला देवदूत; गोवा–मुंबई इंडिगो विमानात प्रवाशाचे वाचवले प्राण 
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा February 09, 2026 01:13 PM

Indigo Airplane: गोवा–मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या इंडिगो विमानात अचानक आजार बळावलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवून वसईतील वैद्यकीय विद्यार्थ्याने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. आर्यन लोलयेकर, हा वसईतील रहिवासी आणि एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून, त्याच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

आपल्या कुटुंबियांसोबत गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या इंडिगो विमानात उड्डाणानंतर काही वेळातच एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. संबंधित प्रवासी बेशुद्ध पडला होता, त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे विमानातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. यावेळी विमानातील क्रू मेंबरांनी “विमानात कोणी डॉक्टर आहे का?” अशी विचारणा केली असता आर्यन लोलयेकर यांनी तात्काळ पुढे येत मदतीची तयारी दर्शवली. प्रवाशाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याच्या रक्तातील साखर कमी झाल्याचे आणि ऑक्सिजन पातळी घटल्याचे आर्यनच्या लक्षात आले. विमानात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय उपकरणांचा आणि ऑक्सिजन किटचा योग्य वापर करत त्यांनी प्रवाशावर तातडीचे प्राथमिक उपचार सुरू केले. काही वेळातच प्रवाशाची प्रकृती स्थिर होऊ लागली.

संबंधित प्रवाशाला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात केले दाखल-

विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरल्यावर संबंधित प्रवाशाला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्यन लोलयेकर यांच्या प्रसंगावधानामुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले. या घटनेनंतर विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबरांनी आर्यन यांचे मनापासून कौतुक केले. भावी डॉक्टर म्हणून सामाजिक जबाबदारी जपत आर्यन यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वसईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही घटना असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.