तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
सुनील भोंगळ February 09, 2026 01:13 PM

Ahilyanagar Crime News: फोनवर बोलत नसल्याचा आणि नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली आहे. या हल्ल्यात नृत्यांगना गायत्री सावंत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.

Ahilyanagar Crime News: धमकीनंतर थेट हल्ला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री तुषार सावंत (वय 26, व्यवसाय – नृत्यांगना, मूळ रा. वाघोली, जि. पुणे, सध्या रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहिल्यानगर) ही तिची मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे हिच्यासोबत वास्तव्यास आहे. गायत्री सावंत नृत्यांगनेचे काम करून आपली उपजीविका करते. फिर्यादी गायत्री सावंत हिची आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी मागील पाच वर्षांपासून ओळख होती. मात्र, 2024 पासून दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही फिर्यादी महिलेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.

Ahilyanagar Crime News: ‘बोलली नाहीस तर मारून टाकीन’ 

गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल कचरे याने फिर्यादी महिलेला फोन करून, “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली होती. यानंतर फिर्यादीने त्याचा फोन कट केला.

Ahilyanagar Crime News: पहाटे कोयत्याने हल्ला

यानंतर शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास, गायत्री सावंत तिच्या खोलीत मैत्रीण मनिषा जावळे हिच्यासोबत असताना, मनिषा बाल्कनीत गेली. त्याच वेळी आरोपी राहुल कचरे हा इमारतीजवळ दबा धरून बसलेला होता. आरोपीने हातात कोयता घेऊन थेट फिर्यादीच्या खोलीत घुसून, “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असे म्हणत गायत्री सावंतच्या बोटांवर, हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.

Ahilyanagar Crime News: हल्ल्यानंतर आरोपी फरार

यावेळी मैत्रीण मनिषा जावळे हिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न करत “मारू नको” अशी विनंती केली. मात्र आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत “मी तुला संपवून टाकणार आहे,” अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गायत्री तुषार सावंत हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल अशोक कचरे याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा 

Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.