धक्कादायक! हिंदी महासागराचे पाणी होतेय ‘गोड’; शास्त्रज्ञांनी दिला हवामान बदलाचा मोठा इशारा
Marathi February 12, 2026 02:25 PM

गेल्या अनेक दशकांपासून हिंदी महासागर हा जगातील सर्वात खारट जलाशयांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र, आता या महासागराचे स्वरूप बदलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दक्षिण हिंदी महासागरातील खाऱ्या पाण्याचे प्रमाण (Salinity) गेल्या ६० वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाले असून, हा भाग आता अधिक ‘गोड’ किंवा कमी खारट होत आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलराडो बोल्डर’ने प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार, ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीजवळील समुद्रातील क्षारता झपाट्याने कमी होत आहे.

क्षारता कमी होण्याचे परिणाम काय?

समुद्राचे मीठ किंवा क्षारता केवळ चवीपुरती मर्यादित नसते. पाण्याचे घनत्व, समुद्राचे प्रवाह, हवामान आणि पावसाचे चक्र यावर क्षारतेचा मोठा परिणाम होतो. खारट पाणी जड असल्याने ते समुद्राच्या तळाशी जाते, तर कमी क्षारतेचे पाणी हलके असल्याने पृष्ठभागावर तरंगते. हा समतोल बिघडल्यास जागतिक हवामान साखळीवर (Climate System) गंभीर परिणाम होऊ शकतात.

हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा

हिंदी महासागरातील हे बदल हिंदुस्थानसाठी चिंताजनक ठरू शकतात.

हिंदुस्थानचा मान्सून प्रामुख्याने हिंदी महासागरातील प्रवाहावर अवलंबून असतो. पाण्याच्या घनतेत बदल झाल्यामुळे पावसाचे वेळापत्रक बदलू शकते किंवा पावसाच्या प्रमाणात अनपेक्षित चढ-उतार येऊ शकतात.

क्षारतेतील बदलामुळे समुद्रातील प्लँक्टन आणि माशांच्या स्थलांतरावर परिणाम होऊन मत्स्यव्यवसायाला फटका बसू शकतो.

समुद्राच्या प्रवाहातील बदलांमुळे किनारपट्टी भागातील तापमानात आणि वादळांच्या तीव्रतेत बदल होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाऱ्यांच्या दिशा आणि पाण्याचे प्रवाह बदलत आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कमी क्षारतेचे पाणी आता दक्षिणेकडे ढकलले जात आहे. हे प्रमाण इतके मोठे आहे की, दरवर्षी ‘लेक टाहो’ (Lake Tahoe) मधील ६० टक्के पाणी समुद्रात ओतल्यासारखी ही स्थिती आहे.

सध्या संशोधक उपग्रह, सेन्सर्स आणि अत्याधुनिक साधनांच्या मदतीने या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हिंदी महासागरात होणारे हे सूक्ष्म बदल हजारो किलोमीटर दूर असलेल्या युरोप आणि आफ्रिकेच्या हवामानावरही परिणाम करू शकतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.