पुणे : हडपसर येथील २०० टन कचरा प्रकल्पाच्या वर पत्र्याचे शेड मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडे सात कोटी रुपयांची निविदा काढली आहे. हे काम स्थापत्य अभियांत्रिकीचे असताना ते यांत्रिकी अभियांत्रिकीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मिळावे यासाठी खटाटोप सुरु आहे. या निविदेसाठी पाच पैकी चार ठेकेदार पात्र होत असून हा ‘विशेष कामगिरी’ करणारा ठेकेदार अपात्र होत असूनही त्याबाबतचा निर्णय अधिकारी राजकीय दबावामुळे घेऊ शकलेले नाहीत.
पुणे महापालिकेचा हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये २०० टनाचा कचरा प्रक्रिया प्रकल्प असून, तेथील शेड जुने झाल्याने नवे शेड बांधण्यासाठी घनकचरा विभागाने साडे सात कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यात पाच ठेकेदारांनी निविदा भरली आहे. पण त्यातील एकाने ऑनलाइन निविदा भरताना कामाचा अनुभव दर्शविणारे बीओक्यु जोडलेले नव्हते. पण प्रशासनाने या ठेकेदाराला कागदपत्र जमा करण्यासाठी मुदत दिली आहे.
Pune Biomining Project : बायोमायनिंगचे काम कमी दराने करण्यास ठेकेदारांची तयारी; स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव जाण्याची शक्यता!पण यामुळे गेल्या आठवड्यापासून ही निविदा खोळंबली आहे. तसेच ठेकेदाराला यांत्रिकी पद्धतीने काम केलेले जुने पुरावे जोडले असून, त्यावरून पात्र करावे यासाठी आमच्यावर दबाव येत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान याप्रकणाबाबत आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी तक्रार करून कोणत्याही दबावाला बळी न पडता कागदपत्र व गुणवत्तेच्या आधारावर निविदा प्रक्रिया पुढे न्यावी अशी मागणी केली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, ‘‘हडसपर येथे कचरा प्रकल्पावर शेड टाकण्याच्या निविदेत कागदपत्रांची छाननी सुरु असून, यामध्ये कोणताही चुकीचा निर्णय होणार नाही. योग्य ठेकेदारांना पात्र ठरवले जाईल.’’