तक्रारवाडी टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत
esakal February 22, 2026 02:46 AM

जेजुरी, ता. २१ : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर तक्रारवाडी (ता. पुरंदर) फाट्याजवळ केलेल्या टोलनाक्यावर वीस किलोमीटर अंतराच्या परिसरातील वाहनचालकांना सवलत देणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे विभागाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, अभिजित आवटे यांनी सांगितले.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप, माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेजुरी शहराध्यक्ष रमेश लेंडे, बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत दोडके यांनी सासवड-जेजुरी महामार्गावर तक्रारवाडी फाट्याजवळ नव्याने निर्माण केलेल्या टोलनाक्यावर पुरंदरवासीयांना टोलमाफी मिळावी याबाबत निवेदन देत पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. २०) पुणे येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी नीलेश जगताप, रमेश लेंडे, शिवराज झगडे, यशवंत दोडके, संदीप जगताप आदी उपस्थित होते.
तक्रारवाडीचा टोलनाका बेलसर गावच्या हद्दीत येतो. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत वाहन चालकांकडून टोलवसुलीस प्रारंभ होणार आहे. पुरंदर तालुक्यातील २० किलोमीटर परिसरातील नागरिकांना ३५० रुपयांचा मासिक पास देण्यात येणार आहे, यामध्ये या टोलनाक्यावरून दिवसातून अनेक वेळा ये-जा करता येणार आहे. त्यासाठी आधारकार्ड आणि फास्ट टॅग ऑनलाइन करून घ्यावे लागणार आहे. केंद्र शासनाच्या
धोरणानुसार ३ हजार रुपयांचा वार्षिक पास घेतल्यास प्रत्येक टोलनाक्यावर फक्त १५ रुपये फास्टटॅग मधून वजा होणार आहेत. टोलनाका सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.