आळंदी, ता. २१ : आळंदी नगरपरिषदेचा कचरा डेपो कार्तिक वारीपूर्वी नोव्हेंबर महिन्यापासून धुपत आहे. संपूर्ण कचरा जळून खाक झाला. त्यावर पुन्हा दुसरा कचरा टाकण्यात आल्याने डेपोतील कचरा धुपत आहे. त्यामुळे परिसरात धूर पसरून वायुप्रदूषण वाढले आहे. सलग तीन महिन्यांहून अधिककाळ कचरा पेटता राहूनही नगरपरिषद काहीच करत नसल्याचे चित्र आहे.
नुकतेच तीन दिवसांपूर्वी आळंदी नगरपरिषदेला माझी वसुंधरा अंतर्गत पुणे विभागात चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. घनकचरा व्यवस्थापना बाबत सरकारकडून गौरव तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र धुराचे प्रदूषण असे विरुद्ध प्रकारचे चित्र आळंदी शहरात दिसत आहे. त्याकडे प्रशासनाचा काणाडोळा होत आहे.
आळंदी देवस्थानने नगरपरिषदेला पाच एकरहून अधिक जागा कचरा डेपोसाठी दिली आहे. शहराचा संपूर्ण कचरा या ठिकाणी लोटला जातो. अनेक वेळा कचरा डेपोला आग लागली. मात्र उपाययोजना काहीच केल्या जात नाहीत. नुकतेच कार्तिक वारीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात कचरा डेपोला आग लागली होती. तात्पुरत्या स्वरूपात पाणी मारून आग आटोक्यात आणली. नंतर शहराचा पुन्हा कचरा तिथेच टाकला गेला. तरीही अद्याप कचरा डेपोतून धूर येत आहे. धुराचे प्रदूषण एवढे मोठे आहे की, परिसरात नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने माशांचे प्रमाणही वाढले आहे.
कचरा डेपोमध्ये अनेकदा पाणी मारून आग नियंत्रणात आणली. रात्रीच्या गाड्या भरून कचरा लगतच्या चऱ्होली ग्रामपंचायतीकडून खाली केल्या जातात. आठ दिवसांपूर्वीच कचरा डेपोला गेट बसवले आहे. तर दोन दिवसांपूर्वी चऱ्होली ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक कचरा डेपोमध्ये कचरा घ्या म्हणून आले होते.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
तीन दिवसांपूर्वीच कचरा डेपोला भेट दिली होती. आगीच्या घटना घडल्यानंतर त्या आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचे कनेक्शन कायमस्वरूपी घेतले जात आहे. याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनासाठी आता ठेका खासगी व्यक्तीला न देता एनजीओ मार्फत व्यवस्थापन केले जाईल.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष, आळंदी नगरपरिषद