IITM Pune News: दशकभराचा मॉन्सून अंदाज आता शक्य; पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, 'आयआयटीएम'ची नवी 'प्रणाली'!
esakal February 23, 2026 01:45 PM

पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा कणा असलेल्या मॉन्सूनचा आता केवळ एका हंगामापुरता नव्हे, तर चक्क पुढील दहा वर्षांचा (दशकभराचा) अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थे’तर्फे (आयआयटीएम) ‘दशक हवामान अंदाज प्रणाली’ विकसित करण्यात आली. या प्रणालीमुळे पावसाचे प्रमाण, तापमानातील बदल आणि जागतिक हवामान बदलांचा आपल्या मॉन्सूनवर होणारा परिणाम अधिक अचूकपणे समजायला मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाचा सविस्तर अहवाल ‘आयआयटीएम’तर्फे नुकताच प्रसिद्ध केला आहे.

Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..

भारतीय मॉन्सूनमध्ये दरवर्षी आणि दर दहा वर्षांनी होणारे मोठे बदल समजून घेणे, हे नेहमीच आव्हानात्मक असते. यावर मात करण्यासाठी ‘आयआयटीएम’ने ही नवी प्रणाली विकसित केली असून, हवामान संशोधनात ही एक मोठी आणि महत्त्वाची झेप मानली जात आहे. एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी अधिक खात्रीशीर अंदाज वर्तवता यावा, यासाठी संस्थेच्या आधीच्या ‘पृथ्वी प्रणाली नमुन्यावर’ आधारित हे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

या नव्या प्रणालीत केवळ हवेचाच नाही, तर जमिनीखालच्या आणि वातावरणातील अनेक घटकांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये जमिनीचा प्रकार, माती, वनस्पती, जमिनीच्या आतले तापमान आणि भूप्रदेशाची रचना यांचा समावेश आहे. याशिवाय हवेतील सूक्ष्म कण, प्रदूषण वाढवणारे वायू (हरितगृह वायू), ओझोन आणि सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव या सगळ्याचाही विचार केला गेला आहे. या मुळे पाऊस, तापमान आणि हवेतील आर्द्रता यांचे अधिक अचूक अंदाज मिळणे सोपे झाले आहे. ही प्रणाली अतिशय प्रगत असली, तरी यात अजून काही सुधारणांना वाव असल्याचे संशोधकांनी प्रांजळपणे सांगितले. विशेषतः समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील बदल आणि हवेतील सूक्ष्म कण आणि ढग यांचा एकमेकांवर होणारा परिणाम, यावर अधिक अचूकता आणण्यासाठी भविष्यात काम केले जाणार आहे.

अचूकतेत मोठी वाढ

‘आयआयटीएम’च्या अहवालानुसार, या नव्या प्रणालीमुळे हवामानाच्या अंदाजातील त्रुटी खूप कमी झाल्या आहेत. भारतातील मुख्य मॉन्सून पट्ट्यात नक्की किती पाऊस पडेल, याचे अधिक वास्तवदर्शी चित्र यातून उभे राहते. मॉन्सूनच्या वाऱ्यांची दिशा, त्यांचा वेग, तापमानातील बदल याबरोबरच प्रशांत आणि अटलांटिक महासागरात होणाऱ्या हवामान बदलांचा (चक्रे) भारतीय मॉन्सूनवर काय परिणाम होईल, हेही या प्रणालीद्वारे अचूकपणे समजणार आहे.

कोणाला होणार फायदा?

आजवर मॉन्सूनचा अंदाज केवळ एका वर्षापुरता मर्यादित असायचा. मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे पुढील दहा वर्षांच्या हवामानाचा कल समजणार आहे. त्यामुळे देशाचे शेती नियोजन, धरणे आणि पाण्याचे व्यवस्थापन, तसेच दुष्काळ व आपत्ती व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन धोरण ठरविणे प्रशासनाला अधिक सोपे होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: चाळीस प्रवाशांचे दहा तास हाल! नागपूर-मुंबई बस हर्सूल टोलजवळ बंद, महिला-मुले रात्रभर थंडीत कुडकुडले.. या संशोधकांचे योगदान

हा संशोधन अहवाल पी. व्ही. राजेश, रोसिमिथा पांडा, सी. ज्ञानसीलन, राहुल पै, रश्मी काकटकर, दर्शना पाटेकर, जे. एस. दीपा, ए. जी. प्रजीश, अमित कुमार शर्मा, टी. एस. फौसिया, सुब्रता हलदर, अनिला सेबॅस्टियन, अनंत पारेख आणि सैकत प्रमाणिक या शास्त्रज्ञांच्या चमूने तयार केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.