कोपर्डे हवेली : अज्ञातांकडून पाईपलाईनची तोडफोड
esakal February 28, 2026 06:45 AM

अज्ञातांकडून शेतातील पाइपची तोडफोड


शामगावला सौरऊर्जा केबलही चोरीस; शेतकऱ्यांत संताप

कोपर्डे हवेली, ता. २७ : दुष्काळी पट्ट्यातील शामगाव येथे अज्ञात व्यक्तींनी शेतातील पाइपलाइन, चेंबर व सौरऊर्जा पंपाच्या वायरची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकरी संभाजी पोळ यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

शामगाव हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. येथील शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी विविध उपाययोजना करत असतात. श्री. पोळ यांनी ढाकूबाई खिंड येथील शिवारात शेतीसाठी शेततळे काढले आहे. सध्या विहिरीची पाणीपातळी कमी होत असल्याने विहिरीतील पाणी शेततळ्यात भरण्यासाठी त्यांनी पाइपलाइन टाकली होती. त्यासाठी स्वतंत्र चेंबरचीही व्यवस्था केली होती. मात्र, अज्ञातांनी पाइपलाइन फोडून चेंबरचे नुकसान केले. विहिरीवरील सोलर ते शेततळ्यापर्यंतची केबल वायर अज्ञातांनी चोरून नेली आहे. या घटनेमुळे शेतीच्या कामांवर परिणाम झाला असून, आर्थिक फटका बसला आहे.
या प्रकाराची संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे श्री. पोळ यांनी सांगितले. परिसरात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
..........
कोट :
.........

गेल्या दोन वर्षांपासून सतत अज्ञातांकडून शेतातील साहित्याचे नुकसान होत आहे. चेंबर तोडणे, पाइप फोडणे, केबल चोरीस जाणे अशा प्रकारांमुळे शेती करावी की नको? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- संभाजी पोळ,
शेतकरी, शामगाव


B02459
शामगाव : शेतकरी संभाजी पोळ यांच्या शेतातील पाइपलाइन व साहित्याचे अज्ञातांनी केलेले नुकसान. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)
.........................................................

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.