भिवंडीत स्वच्छता मोहिमेला सुरुवात
भिवंडी, ता. २७ (वार्ताहर)ः महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झाल्यानंतर त्यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी त्यांच्या पुढाकाराने शहरात डीप क्लीन स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. ज्यामध्ये रस्त्यावरील धूळ माती संपूर्णतः उचलून घेऊन पाणी फवारणी केली जाणार आहे. शुक्रवारी कल्याण नाका वाहतूक शाखा कार्यालय येथून महापौर नारायण चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी शहर अभियंता जमील पटेल, सार्वजनिक स्वच्छता विभाग प्रमुख फैजल तातली, मुख्य स्वच्छता निरीक्षक जे. एम. सोनवणे, भंडारी व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. शहरातील स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देणार असून, त्याचसाठी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा मनोदय आहे. ज्यामध्ये पालिका कर्मचारी नागरिक या सर्वांचे सहकार्य मोलाचे राहणार आहे.