राज्यात सकाळपासूनच धुळवडीची धूम सुरू आहे. अनेकजण कुटुंबासोबत घरातच धुळवड साजरी करताना दिसत आहेत. तर काही जण मित्र आणि नातेवाईकांसोबत धुळवड साजरी करताना दिसत आहे. बीडबधील एक तरुणही मित्रांसोबत धुळवड साजरी करायला काल रात्री निघाला होता. पण रात्रीच्या काळोखात भयंकर असं काही घडेल हे त्याला वाटलंच नव्हतं. कारच्या चालकाचं अचानक कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार चारवेळा पलटी झाली अन् थेट विहिरीच्या कठड्यालाच जाऊन धडकली. यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे बीड शहरावर शोककळा पसरली आहे.
धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याने एक तरूण जागीच ठार तर तिघेजण जखमी झाले आहेत. बीड ते शिरूर रोडवर रायमोहा गावाजवळ ही दुर्देवी आणि भीषण घटना घडली. कृष्णा मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धुलीवंदनाचा सण साजरा करायला वॉटर पार्कला जात होता. मध्यरात्री त्यांची गाडी बीड ते शिरूर रस्त्यावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला पलट्या खात थेट एका विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा जागीच ठार झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे व अन्य एक जण यामध्ये जखमी झाले. या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक गाडी होती. त्या गाडीतील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
असा झाला अपघात
व्हेरा आणि थार अशा दोन कार घेऊन हे मित्र निघाले होते. बीडवरून ते शिरूर कासारमार्गे जात होते. पण नागऱ्याचीवाडी येथे आले असता कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार चारवेळा पलटली झाली. कार धाडधाड पलटी झाल्याने कारमधील सर्वांना जबर मार लागला. त्यानंतर ही कार थेट विहिरीच्या कठड्यावर जाऊन आदळली. त्यामुळे कृष्णाला जबर मार लागल्याने त्याने जागीच प्राण सोडल्याचं सांगितलं जातं. या कारमधील प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एकजण असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
धुळवड दिली नाही म्हणून मारहाण
दरम्यान, इचलकरंजी शहरातील जवाहर नगर परिसरामध्ये आज धुळवळीचा सण मोठ्या उत्साहात पार पडत असताना काही ठिकाणी त्याला गालबोट लागले आहे. काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर आज जवाहर नगर परिसरात एक युवक सायकलवरून कामावरून घरी जात असताना धुळवड दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलांनी त्या युवकाला जबर मारहाण केली. इचलकरंजी शहरांमध्ये धूळवाडीचा सण कुठल्या पद्धतीने खेळला जातो आहे हे आता मात्र समजू शकत नाही. गाड्यांची तोडफोड करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. ही अल्पवयीन मुले धुळवडीच्या नावाखाली हुल्लडबाजी करत आहेत. त्यांच्या आई-वडिलांवर आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. ज्या व्यक्तीला मारहाण केली आहे, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. जे मारहाण करत आहेत, त्यांचा पोलीस या व्हिडिओच्या माध्यमातून शोध घेत आहेत.