T20 WC, IND vs ENG: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, प्लेइंग-११ मधील जागेवर प्रश्नचिन्ह... भारताचे कोच काय म्हणाले?
esakal March 04, 2026 07:45 PM

भारत आणि इंग्लंड़ क्रिकेट संघात गुरुवारी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा उपांत्य सामना रंगाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकून विजेतेपदाच्या आणखी जवळ जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे.

सलग तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत (T20 World Cup Semi-Final) भारत आणि इंग्लंड (India vs England) दोन संघ आमने-सामने आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असून दोन्ही संघांनी ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत.

T20 World Cup: सूर्यकुमार खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंशी कसा वागतो? स्वत:च केला खुलासा

पण या सामन्यापूर्वी सध्या भारतीय संघाला सलामीवीर अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) फॉर्मची चिंता आहे. अभिषेकला ६ सामन्यांत केवळ एकदाच अर्धशतक करता आले आहे, तसेच सुरुवातीच्या तीन सामन्यात, तर तो भोपळाही फोडू शकला नव्हता.

इतकेच नाही, तर सुपर ८ मधील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्याकडून झेलही सुटले होते. त्यामुळे सध्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र असे असले तरी त्याला संघात कायम केले जाईल, असे संकेत भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने (Morne Morkel) दिले आहेत.

सामन्याच्या पूर्व संध्येला बोलताना मॉर्केल म्हणाला, 'कधी कधी हा खेळ तुमच्याबाबतीत खूप कठोर होतो. अशीच परिस्थितीत संजू सॅमसनबाबतही होती. तुमच्या कारकिर्दीत असे क्षण येतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या त्याच्यासारख्या युवा खेळाडूची प्रगती यातून होईल. उद्या त्याच्यासाठी नवं पान उघडेल. त्याने गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध शतक केले होते. त्याला फार दिवस झालेले नाहीत.'

याशिवाय मॉर्केलने भारतात अचानक उष्णता वाढली असल्याने खेळपट्टी कशी असेल, याबाबत निश्चित माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच सामन्याच्या परिस्थितीवर प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय होईल, असं तो म्हणाला.

तसेच, भारतीय गोलंदाजही सध्या मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत, याबाबत तो म्हणाला, उपांत्य फेरीत कसे पोहचलो, यापेक्षा आता यापुढचे दो सामने कसे खेळायचे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला १२० धावांमध्ये रोखू शकत नाही. याशिवाय क्षेत्ररक्षणातील सुधारणांबाबत मात्र संघात चर्चा झाल्याची त्याने सांगितले. त्यावर मेहनत घेत असल्याचे तो म्हणाला.

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

मॉर्केलने असेही सांगितले की हा सामना मोठा धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे कारण त्यांना खेळपट्टी चांगली असेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला १० विकेट्सने, तर २०२४ मध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडला ६८ धावांनी पराभूत केले होते. आता तिसऱ्यांदा उपांत्य सामन्यात कोण कोणावर भारी पडणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.