Malegaon Crime : करगोट्याने आवळला गळा; मालेगाव बलात्कार आणि खून खटल्यात डॉक्टरांची धक्कादायक साक्ष
esakal March 05, 2026 06:45 PM

मालेगाव: डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्या निर्घृण खून प्रकरणी येथील न्यायालयात बुधवारी (ता. ४) तीन महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. नराधम आरोपीने पीडितेचा करगोट्याने गळा आवळून खून केल्याचे साक्षीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. तसेच रक्ताचे डाग नराधमाच्या डीएनए अहवालावरून त्याचेच असल्याचे स्पष्ट झाले. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी साक्षी नोंदविल्या.

डोंगराळे येथील बालिकेवर १६ नोव्हेंबर २०२५ ला अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला त्याच दिवशी अटक केली होती. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. शासनाने खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

येथील पॉक्सो न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत जवळपास पंधरा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या, तसेच संशयित आरोपीच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेतली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. पाटील यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे.

पीडित मृत बालिकेचे तसेच नराधम आरोपीचे कपडे व घटनास्थळी गुन्ह्याचे पुरावे यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली. कपड्यावर असलेले रक्त आरोपीचे असल्याचे डीएनएवरून सिद्ध झाले. तसेच लैंगिक अत्याचारानंतर पीडितेचा खून करण्यात आला. ते रक्त पीडितेचे असल्याचे स्पष्ट झाले.

Kagal MIDC Crime News : होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीदेखील महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली. नराधम आरोपीने पीडितेला चावा घेतल्याने तिच्या पोटावर व डोक्यावर जखमा होत्या. तसेच करगोट्याने तिचा गळा आवळण्यात आला. करगोट्याने तिचा गळा आवळून खून होऊ शकतो अशी महत्त्वाची साक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले. फॉरेन्सिक लॅबमधील एका साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. गुरुवारी (ता. ५) आणखी काही साक्षीदार तपासण्यात येणार आहेत. खटल्याचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे ॲड. निकम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.