हल्लीच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनची बॅटरी जास्त वेळ टिकावी यासाठी आपल्याला अनेकदा वाय-फाय आणि ब्लूटूथ बंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण असे केल्याने खरंच बॅटरीची बचत होते का, याबदद्ल आज आपण जाणून घेणार आहोत.
सुरुवातीच्या स्मार्टफोनमध्ये असे मानले जायचे की ब्लूटूथ आणि वाय-फाय चालू राहिल्यामुळे बॅटरी लवकर संपते. मात्र आधुनिक स्मार्टफोन्समध्ये आता प्रगत चिपसेटचा वापर केला जातो, ज्याचा बॅटरीवर कोणताही मोठा परिणाम होत नाही.
सध्याचे स्मार्टफोन Bluetooth Low Energy (BLE) या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे तंत्रज्ञान केवळ २.५ मेगावॅट इतकी नगण्य वीज वापरतात. जेव्हा तुम्ही हेडफोन किंवा स्मार्टवॉच वापरत नसाल, तेव्हा ब्लूटूथ आपोआप स्लीप मोडमध्ये जाते. ते फक्त तेव्हाच सक्रिय होते जेव्हा डेटा ट्रान्सफरची गरज असते. ज्यामुळे बॅटरीचा वापर शून्याप्रमाणेच होतो.
जर तुमचा फोन घर किंवा ऑफिसच्या वाय-फायशी जोडलेला असेल, तर तो मोबाइल डेटाच्या (4G/5G) तुलनेत खूपच कमी ऊर्जा वापरतो. प्रवासात असताना फोन नवीन नेटवर्कच्या शोधत असतो, त्यामुळे तेव्हा काही प्रमाणात बॅटरी खर्च होते.
पण हा फरक दिवसाकाठी केवळ १ ते २ टक्के इतकाच असतो. त्यामुळे वाय-फाय बंद करून फार मोठी बॅटरी बचत होते असे नाही. जर तुमच्या फोनची बॅटरी वेगाने उतरत असेल, तर त्यासाठी ब्लूटूथ किंवा वाय-फाय जबाबदार नसून इतर गोष्टी कारणीभूत असू शकतात.
उच्च ब्राइटनेस बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू असतो. तसेच सोशल मीडिया किंवा लोकेशन ट्रॅकिंग ॲप्स सतत बॅटरी वापरतात. त्यासोबतच सिम कार्डचे नेटवर्क लो असेल तर फोन टॉवर शोधण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते.
थोडक्यात सांगायचे तर, आधुनिक स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ आणि वाय-फाय सतत चालू ठेवल्याने बॅटरीवर कोणताही मोठा परिणाम होत नाही. उलट, यामुळे Find My Device सारखे फीचर्स आणि स्मार्ट गॅजेट्स कनेक्टिव्हिटी अधिक चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे यापुढे तुम्ही बॅटरीच्या चिंतेशिवाय हे फीचर्स सुरू ठेवू शकता.