पिंपरी, ता. ५ : एकेकाळी केवळ दात किंवा दाढेत चांदी भरणे किंवा दात काढण्यापुरतेच मर्यादित असलेले दंतवैद्यकीय क्षेत्र कमालीचे बदलले आहे. दंतवैद्यांची भूमिका ही केवळ दातांवर उपचारांपुरती मर्यादित न राहता, ते आता ‘स्माइल डिझाइनर’ म्हणून ओळखले जात आहेत. सहा मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय दंतवैद्यक दिन’ म्हणून साजरा केला जातो. हिरडे आणि तोंडाच्या आरोग्याबाबत जागरुकता, दंतवैद्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
कोणत्याही व्यक्तीचे हास्य हे त्याच्या सौंदर्यात भर घालते. मात्र, हसताना आपल्या दंतपंक्तीही स्वच्छ व सुंदर दिसाव्यात, समोरच्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी यासाठी दातांचे सौंदर्य राखण्याबाबत आजचे तरुण कमालीचे जागरूक आहेत. त्यामुळे दंतवैद्याकडे तरुणाईची गर्दी वाढत आहे. दंकवैद्यक या शाखेतही दंत सौंदर्यशास्त्र ही नवीन संकल्पना रुजू लागली आहे. याअंतर्गत विविध उपचार घेऊन आपल्या दंतपंगती सुंदर केल्या जात आहे. विशेषतः लग्न जमवणे किंवा नोकरीची तयारी करताना तरुणाई उपचार घेत आहे.
दंत सौंदर्यशास्त्रात केले जाणारे उपचार
स्माइल करेक्शन : दात सरळ करून चेहऱ्याला सुबकता आणणे
टीथ व्हाइटनिंग : दात चमकवण्यासाठी लेझर ट्रिटमेंटचा वापर
डेंटल इम्पलँट्स : नैसर्गिक दातांप्रमाणेच दिसणारे आणि कार्य करणारे कायमस्वरुपी कृत्रिम दात
दातांचे आरोग्यही महत्त्वाचे
एका बाजूला तरुण पिढी दातांचे आरोग्य व सौंदर्य याकडे विशेष लक्ष देत असताना दुसरीकडे लहान मुलांमध्ये मात्र दातांच्या समस्या वाढत आहे. जंक फूड व अतिगोड पदार्थांचे सेवन, तंतूमय पदार्थांचा आहारातील अभाव आणि दातांच्या स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अगदी लहानपणापासूनच मुलांना दातदुखीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अगदी लहान वयातच दातात चांदी भरणे, रूट कॅनॉल किंवा दात काढणे यासारख्या वेदनादायक उपचारांना लहानग्यांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांचे दात दुधाचे असले आणि ते पडणार असले, तरी त्याची काळजी घेणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे दंतवैद्य सांगतात.
ही काळजी घेणे आवश्यक
- जंक फूडचे सेवन टाळावे
- अति गोड पदार्थांचे सेवन टाळावे
- आहारात तंतुमय पदार्थांचे सेवन वाढवावे
- वर्षातून दोन वेळा आपल्या दातांची तपासणी करून घ्यावी.
- सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना ब्रश करावा
दात दुखला, की तो काढणे हाच एकमेव उपचार मानला जायचा. मात्र, आज दंतचिकित्सा क्षेत्र अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक निदान आणि सौंदर्यवर्धक उपचारांमुळे हे क्षेत्र आरोग्यसेवेत महत्त्वाचे ठरत आहे. दंत सौंदर्यशास्त्रार्तंगत उपचार घेण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. मात्र, अनेक आजारांचे मूळ हे आपल्या तोंडात असते. त्यामुळे तोंडाची स्वच्छता, दातांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे.
- डॉ. अभिजित फरांदे, दंतवैद्य
PNE26W00988