विमा दाव्याची रक्कम नाकारली मेडिक्लेम कंपनीस दहा हजार रुपये दंड : ग्राहक मंच सोलापूर चा निकाल
esakal March 07, 2026 11:45 AM

मेडिक्लेम नाकारल्याप्रकरणी विमा कंपनीला १ लाख २० हजार रुपये देण्याचे आदेश

पंढरपूर, ता. ६ : मेडिक्लेमचा दावा नाकारल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा कंपनीला दणका दिला असून पंढरपूर येथील शिक्षक राजेश धोकटे यांना सुमारे १ लाख २ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. डेंगीच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाचा दावा नाकारल्यामुळे आयोगाने विमा रक्कम, व्याज तसेच मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.
द. ह. कवठेकर प्रशालेतील सहशिक्षक राजेश धोकटे यांनी पॅरामाऊंट हेल्थ सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स टीपीए प्रा.लि., ठाणे आणि इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीत पत्नी व दोन अपत्यांचा समावेश होता. धोकटे यांचा मुलगा पवन याला डेंगीचा त्रास झाल्याने सोलापूर येथील डॉ. नितीन तोष्णीवाल यांच्या रुग्णालयात अंतररुग्ण म्हणून दाखल केले होते. उपचारानंतर झालेल्या खर्चाची भरपाई मिळावी, यासाठी धोकटे यांनी विमा कंपनीकडे अर्ज केला. मात्र, या आजारासाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती व बाह्यरुग्ण उपचारांनी तो बरा होऊ शकला असता, असे कारण देत कंपनीने मेडिक्लेमची रक्कम देण्यास नकार दिला.
या निर्णयाविरोधात धोकटे यांनी कंपनीकडे अनेकदा लेखी अर्ज व स्मरणपत्रे दिली. तसेच ॲड. ए. ए. कुलकर्णीमार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यामुळे अखेर धोकटे यांनी २१ मे २०२४ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारदाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर आयोगाने विमा कंपनीकडून सेवा देण्यात त्रुटी झाल्याचे नमूद केले. त्यानुसार विमा कंपनीने धोकटे यांना ८२,४५३ रुपये विमा रक्कम दावा नाकारलेल्या तारखेपासून वार्षिक सहा टक्के व्याजासह अदा करावी, तसेच मानसिक त्रास व खर्चापोटी २० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.