Rohit Shetty House Firing Case: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी 13 व्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रवीण लोणकरचा ताबा घेऊन अटक केली. प्रवीण याला आर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आता याप्रकरणी अनेक धक्क करणारे खुलासे झाले आहेत. सांगायचं झालं तर, प्रवीण बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी तुरुंगात होता… प्रवीण लोणकरला अटक केल्यानंतर, गुन्हे शाखेने त्याला 6 मार्च रोजी विशेष मकोका न्यायालयात हजर केलं, जिथे न्यायालयाने त्याला 16 मार्चपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवलं आहे.
गुन्हे शाखा चौकशी करणारएका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसारा, तपासादरम्यान या प्रकरणात प्रवीण लोणकरची भूमिका उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. प्रवीण आणि पुणे, उत्तर प्रदेशातून या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची आता समोरासमोर चौकशी केली जाईल.
तुरुंगात राहून रचला कट…मुंबई गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, प्रवीण लोणकर तुरुंगात असताना रोहित शेट्टीच्या घरी गोळीबाराचा कट रचण्यातही सहभागी होता. गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रवीण लोणकरने शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबारात वापरलेल्या बंदुकीसह एकूण तीन बंदुका अज्ञात ठिकाणी ठेवल्या होत्या आणि फक्त लोणकरलाच याची माहिती होती.
लोणकर याने सांगितल्यानंतर, आरोपी आसाराम फसाळे त्या ठिकाणी गेला आणि त्याने तीन बंदुका उचलल्या आणि नंतर त्या आरोपी स्वप्नील सकटला दिल्या. एवढंच नाही तर, रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारात वापरलेले वाहन आणि शस्त्रे पुरविण्याची जबाबदारी पुण्यातील मॉड्यूलवर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर या मॉड्यूलचे समन्वयक होता. प्रवीणच्या अटकेमुळे आणखी अनेक खुलासे होण्याची अपेक्षा आहे.
पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोईचा खास असलेल्या गँगस्टर शुभम लोणकरच्या माणसांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे मुंबईतील जुहू येथील बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घटनेची जबाबदारी देखील लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली… याआधी देखील लॉरेन्स बिश्नोई गँगने अनेक सेलिब्रिटींना धमकी दिली आहे.
अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर देखील गोळीबार करण्यात आलेला. एवढंच नाही तर, अभिनेत्याला अनेकदा धमकी देखील देण्यात आली. अभिनेता रणवीर सिंग याला देखील लॉरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिली. अभिनेता आयुष शर्मा याला देखील धमकी देण्यात आली आहे. सध्या बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण आहे.