सोशल मिडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; मुंब्रामध्ये खळबळ
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई March 07, 2026 01:13 PM

Baba Khan: ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी पहाटे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कन्स्ट्रक्शन व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (Baba Khan) (वय 45) यांच्या घराबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या गाडीवर गोळी झाडली तसेच हवेतही गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे पावणे पाचच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत नदीम खान यांच्या घरासमोर येत गोळीबार केला. यामध्ये एक गोळी घराबाहेर उभ्या असलेल्या कारला लागली असून वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यानंतर आरोपींनी हवेत दोन गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Baba Khan: पोलिसांवरही दोन राऊंड गोळीबार फायर

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींकडून पोलिसांवरही दोन राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Baba Khan: एका आरोपीला अटक, एक फरार

दरम्यान, मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (वय 28) या आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. घटनेनंतर नदीम खान यांच्या घराबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंब्रा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीम खान हे मुंब्रा परिसरात कन्स्ट्रक्शन व्यवसाय करत असून ते सोशल मीडियावरही सक्रिय असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची ओळख आहे.

Baba Khan: यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा 

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये नदीम खान हल्लेखोरांवर संताप व्यक्त करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच यापूर्वीही आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या आणि याबाबत पोलिसांकडे तक्रारही दिली होती, असा दावा खान यांनी केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गोळीबारामागील नेमके कारण काय होते, याचा सखोल तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा 

LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.