इराण आणि अमेरिकेमधील युद्ध दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. इराणच्या सशस्त्र दलांनी दावा केला आहे की, बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला केला आहे. इराणच्या दाव्यानुसार या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या 21 सैनिकांचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराणने बहरीनची राजधानी मनामा येथील जुफैर परिसरात असलेल्या युनायटेड स्टेट्स नेव्हीच्या फिफ्थ फ्लीटच्या मुख्यालयावर नव्याने हल्ला केला. इराणी माध्यमांनी एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे, ज्यात हल्ल्यानंतर त्या ठिकाणी आग लागल्याचे दिसत आहे. अमेरिकन नौदलाचा हा पाचवा ताफा नेव्हल सपोर्ट अॅक्टिव्हिटी बहरीन येथे तैनात आहे आणि हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचे लष्करी केंद्र मानले जात. त्यामुळे इराणकडून याला लक्ष्य करण्यात आले आहे.
अमेरिकन नौदलाचा हा ताफा सुमारे 25 लाख चौरस मैल समुद्री क्षेत्रावर नजर ठेवतो. ज्यात पर्शियन गल्फ, रेड सी आणि अरबी समुद्राचा समावेश आहे. या ताफ्याचे मुख्य काम स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मार्गे जाणाऱ्या व्यापार आणि तेल पुरवठ्याचे संरक्षण करणे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना सुरक्षा देणे हे आहे. कारण हा मार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे.
अमेरिकन नौदलाच्या या ताफ्यात साधारणपणे 8000 पेक्षा अधिक नौसैनिक तैनात असतात. यात अनेक युद्धनौका, विमानवाहू जहाजे (Aircraft Carriers), पाणबुड्या आणि ड्रोन प्रणालींचा समावेश असतो. फिफ्थ फ्लीट कंबाइंड मॅरिटाईम फोर्सेस नावाच्या 40 पेक्षा जास्त देशांच्या समुद्री आघाडीसोबतही काम करते. याचे उद्दिष्ट समुद्री चाचेगिरी रोखणे, दहशतवादाविरुद्ध लढा देणे आणि व्यापारी जहाजांची सुरक्षा करणे हे आहे.
याआधी 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि शाहेद-136 ड्रोन वापरून येथे हल्ला केल्याचा दावा केला होता. त्यावेळी समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये तळावरून काळा धूर उठताना दिसत होता. या हल्ल्यात रडार प्रणाली, इमारती आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणांचे मोठे नुकसान झाले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले होते की हल्ल्यावेळी सैनिक बंकरमध्ये होते. त्यावेळी 3 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता नव्याने झालेल्या हल्ल्यात 21 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.