कवितेच्या राजधानीत रंगणार 'कोमसाप'चा वर्धापन दिन
esakal March 23, 2026 10:46 PM

कवितेच्या राजधानीत रंगणार
‘कोमसाप’चा वर्धापन दिन
सावंतवाडी, ता. २३ः आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांची जन्मभूमी आणि ‘कवितेची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचा (कोमसाप) ३५वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा दोन दिवसीय उत्सव उद्यापासून (ता. २४) कवी केशवसुत स्मारकात होणार आहे.
उद्या सकाळी १० वा. वर्धापनदिन सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. या वेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला कोमसापचे विश्वस्त पालकमंत्री डॉ. उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. आमदार संजय केळकर (विश्वस्त), पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आणि विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहतील. दोन दिवसांत विविध वाङ्मयीन कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमात प्रदीर्घ सेवा दिलेल्या साहित्यिकांचा गौरव आणि नवीन पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. या वेळी ‘कोमसापचा आजवरचा प्रवास’ या विषयावर विशेष मंथन केले जाणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात पाटील, अरूण मोर्ये, राष्ट्रपाल सावंत आणि रूजारियो पिंटो हे नामवंत कवी काव्यसादरीकरण करतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.