भंडारा : आखाती देशातील युद्धामुळे सध्या जगभर इंधनाचे दर भडकले आहेत. भारतातही याचे पडसाद उमटत असून, गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून रांगा आणि पोलिसांच्या बंदोबस्तात होणारे वितरण असं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत भंडारा जिल्ह्यातील एका गावाला या टंचाईची कोणतीही झळ बसलेली नाही. लाखनी तालुक्यातील 'रेंगेपार कोहळी' गावाने स्वतःची ऊर्जेची गरज स्वतःच भागवली आहे.
बाहेर सिलेंडर मिळत नाहीये, लोक रांगा लावत आहेत. पण आम्हाला त्याची चिंता नाही. आमच्याकडे पाळीव जनावरं आहेत. आम्ही बायोगॅसवरचं स्वयंपाक करतो. आमचा पैसाही वाचतो आणि वेळेवर गॅसही मिळतो, अशी प्रतिक्रिया देताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर सध्याची युद्धजन्य परिस्थिती बघता समाधान बघायला मिळतं आहे. बायोगॅसमुळं लोकांना कोणत्याही परिस्थितीत गॅस टंचाईचा सामना करावा लागला नाही. बायोगॅसच्या माध्यमातून लोकांनी उर्जेंची गरज भागवली आहे.
एकीकडे गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, गॅस मिळत नसल्यानं घराघरात चुली पेटल्या आहेत. पण भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी हे गाव आज राज्यासाठी एक दीपस्तंभ ठरलं आहे. 2 हजार लोकवस्तीच्या या गावात ना गॅससाठी चिंता ना गॅससाठी रांगा आहेत, ना सरपणासाठी जंगलतोड करण्याची वेळ आली आहे. या गावातील सुमारे 200 कुटुंबांकडे स्वतःचा 'गोबरगॅस' आणि 'बायोगॅस' प्रकल्प आहे. गावात घराघरात दुधाळ जनावरे आहेत, त्यांच्या शेणापासून या गावात गॅसची निर्मिती केली जातं आहे. या गॅस टंचाईच्या काळात गावाने केलेल्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
ज्यावेळी युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे, तेव्हा या गावानं दाखवून दिलंय की, पारंपरिक ऊर्जेचा वापर आपल्याला कसं आत्मनिर्भर बनवू शकतो. रेंगेपार कोहळीच्या या 'ऊर्जा मॉडेल'ची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. संकटाच्या काळात रडत नं बसता पर्यायी मार्ग शोधला तर, तो किती फायदेशीर ठरतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे गाव. रेंगेपार कोहळीनं केवळ पर्यावरणाचं रक्षणचं केलं नाही, तर स्वतःला सिलेंडरच्या रांगेतूनही मुक्त केलं आहे.