आयपीएल स्पर्धेतील 19 व्या पर्वाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या हंगामातील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने होते. तर मोसमातील दुसऱ्या सामन्यात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी मुंबई इंडियन्स 3 वेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. मात्र सामन्याच्या काही तासांआधी मुंबईला मोठा झटका लागला आहे. मुंबईने 2 मॅचविनर खेळाडू या सामन्यासाठी उपलब्ध नसणार. त्यामुळे पलटणची डोकेदुखी वाढली आहे. हे 2 खेळाडू कोण आहेत? त्याबाबत आपण जाणून घेऊयात.
मुंबई टीममधील 2 विदेशी खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसणार असल्याचं समोर आलं आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबईचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह तसेच इतर 2 खेळाडू हे वानखेडे स्टेडियममधील सराव सत्राला हजर राहिले नाहीत.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करणारा मिचेल सँटनर हा नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपविजेत्या संघाचा कर्णधार राहिला. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. सँटनरने त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील 5 पैकी 3 टी 20 सामन्यात न्यूझीलंडचं नेतृत्व केलं. त्यानंतर शेवटच्या 2 सामन्यांतून सँटनरला वर्कलोड मॅनेजमेंटनुसार विश्रांती देण्यात आली होती. आता सँटनर लवकरच मुंबईसह जोडला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबईच्या अडचणीत वाढ
तसेच इंग्लंडचा विल जॅक्स केकेआर विरुद्धच्या सामन्यात निवडीसाठी उबलब्ध नसणार. विल वैयक्तिक कारणामुळे निवडीसाठी उपलब्ध नसणार आहे. मात्र त्यामागील कारण समजू शकलेलं नाही. तसेच विल मुंबई टीमसह विलंबाने जोडला जाणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विल जॅक्स याने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध स्फोटक खेळी केली होती. मात्र विल इंग्लंडला विजयी करण्यात अपयशी ठरला होता.