Pune News: भाजप इच्छुकांच्या स्वप्नांना कात्री; पुण्यात स्वीकृत नगरसेवकांना पाच वर्षांचे नियुक्ती प्रमाणपत्र, नव्याने प्रक्रिया हाेणार!
esakal April 02, 2026 12:45 PM

पुणे: महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांना अडीच वर्षांऐवजी थेट पाच वर्षांच्या मुदतीचे नियुक्ती प्रमाणपत्र मिळाल्याने भाजपमधील अनेक इच्छुकांची संधी हुकली आहे. पक्षाने अडीच वर्षांचा शब्द दिल्याने पुढील काळात संधी मिळण्याची आशा असलेल्या कार्यकर्त्यांचा यामुळे हिरमोड झाला आहे.

Pune Airport News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! चार नव्या शहरांसाठी पुण्याहून उड्डाण; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉटना मंजुरी..

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड होती. अनेक निष्ठावंतांची उमेदवारी कापली. त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली होती. निवडणुकीनंतर ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्याचा निर्णय झाला.

यामध्ये नीलेश कोंढाळकर, राजेंद्र काकडे, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे, उदय लेले यांना भाजपतर्फे संधी दिली आहे; तर काँग्रेसकडून सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता धनकवडे, राकेश कामठे यांना संधी दिली. भाजपने जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे यांनाही संधी दिली. मात्र, त्यांचे अर्ज बाद झाले होते. त्यांच्यासाठी आता पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवली जाईल.

भाजपकडे स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येकाला अडीच वर्षांचा कालावधी दिला जाईल. त्यामुळे पाच वर्षांत १४ जणांना संधी मिळेल. पराभूत झालेल्यांना संधी मिळणार नाही, असे भाजपने कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी सात जणांना संधी दिली. त्यापैकी पाच जणांची निवड झाली. या पाच जणांना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अडीच वर्षांऐवजी पाच वर्षे मुदतीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे ज्यांना या वेळी संधी मिळाली नाही, त्यांना आता पुढील पाच वर्षेही स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Crime: पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग अन् अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा

स्वीकृत नगरसेवकपदासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यावर पक्षात चर्चा झाली होती. मुदतीबाबतचा अंतिम निर्णय आगामी काळात घेतला जाऊ शकतो.

- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.