Priya Berde Comeback Marathi Theatre Play: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतची (Laxmikant Berde) त्यांची केमिस्ट्री सुपरहिट होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटकांमध्येही (Marathi Natak) काम केलंय. दरम्यान, आता अभिनेत्री प्रिया बेर्डे पुन्हा एकदा थिएटरमध्ये पुनरागमन करणार आहे. 'धनंजय माने इथेच राहतात का?' या नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डे पुन्हा एकदा नाट्यरसिकांसाठी थिएटरमध्ये पुनरागमन करणार आहेत. ‘भुल भुलैय्या’ असे नाटकाचे नाव असून, या नाटकात त्यांची मुख्य भूमिका आहे.
‘भुल भुलैय्या’ म्हणजे काय? तर मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला एक प्रवास, तसेच प्रत्येक क्षणी चकित करणारा थरारक अनुभव. जिथे सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं? अन् काय खोटं? हे ओळखणंच कठीण होतं. भ्रम आणि वास्तव यांच्यातील गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ, ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार १९ एप्रिलला दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, येथे संपन्न होणार आहे.
रंगत संगत आणि श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स निर्मित भुल भुलैय्या नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांची आहे. तर, रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भुल भुलैय्या’ मधून रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करत आहेत. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या की, ‘जरी बऱ्याच वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होतोय.
‘भुल भुलैय्या’ या नाटकात प्रिया बेर्डे यांच्यासोबत साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रवि १९ एप्रिल दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सोम २० एप्रिल रात्रौ ८.०० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे मंगळ २१एप्रिल दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे रंगणार आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?