Massajog Sarpanch Election : बीड जिल्ह्यात आजपासून पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोट निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. 13 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. प्रामुख्याने या सर्व निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष असणार आहे ते मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे. कारण दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची आता पोटनिवडणुकीची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय आहेत. सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करुन संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधात उमेदवार उभा राहणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
अर्ज दाखल - 7 ते 13 एप्रिल
अर्जाची छाननी - 15 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख - 17 एप्रिल
मतदान - 28 एप्रिल
निकाल - 29 एप्रिल
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे 9 डिसेंबर रोजी कथितरीत्या अपहरण करून छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील एका कंपनीकडून सुरू असलेला खंडणी वसुलीचा प्रयत्न रोखल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) २७ फेब्रुवारी रोजी देशमुख यांची हत्या आणि इतर दोन संबंधित प्रकरणांत बीड जिल्हा न्यायालयात १,२०० हून अधिक पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले आहे. सरपंचाची हत्या, 'अवादा' (Avaada) कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याप्रकारचे तीन वेगळे गुन्हे बीडच्या केज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनावणे, सुधीर सांगले आणि प्रतीक घुले यांचा समावेश आहे. या प्रकरणात कृष्णा आंधळे हा अद्याप फरार (WANTED) आहे. मृत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांसाठी न्यायाची मागणी केली होती. तर वाल्मिक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष असून तो मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. याच कारणामुळे विरोधकांनी या हत्येच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.