वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिका फक्त एका रात्रीत संपूर्ण इराणला उद्ध्वस्त करू शकते आणि ती रात्र कदाचित उद्याची रात्रही असू शकते, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या मोठ्या रेस्क्यू ऑपरेशनचाही खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, इराणच्या हद्दीत कोसळलेल्या अमेरिकन पायलटला वाचवण्यासाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं बचाव अभियान राबवण्यात आलं.
ट्रम्प यांच्या माहितीनुसार, या धाडसी मोहिमेत सुमारे 200 सैनिक आणि 21 विमानं तैनात करण्यात आली होती. अत्यंत धोकादायक परिस्थितीत हा पायलट सुरक्षित बाहेर काढण्यात आला. ऑपरेशनदरम्यान अमेरिकन विमानांवर जवळून गोळीबारही करण्यात आला, मात्र तरीही सैनिकांनी धैर्याने मिशन पूर्ण केलं. या कारवाईत अमेरिकन सैन्याने आपले एक विमान स्वतःच नष्ट (self-destruct) केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला, जेणेकरून ते शत्रूच्या हाती लागू नये.
ट्रम्प यांनी Central Intelligence Agency (CIA) चीही प्रशंसा केली. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये गुप्तचर यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या मिशनशी संबंधित संवेदनशील माहिती लीक झाल्याचा दावाही त्यांनी केला असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचं स्पष्ट केलं. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर परिस्थिती बिघडली तर अमेरिका तात्काळ कठोर कारवाई करू शकते. आम्ही इराणला एका रात्रीत संपवू शकतो, असं म्हणत त्यांनी लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इराणकडूनही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांनी स्पष्ट केलं की, नेत्यांची हत्या झाली तरी इराण मागे हटणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचे ताजे वक्तव्य आणि इराणकडून त्याला मिळालेलं उत्तर यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.
ही बातमी वाचा: