तुम्ही तहानलेले असता, तेव्हा पाणी पिण्यासाठी शिस्तीची गरज नसते. तुम्ही ते सहजपणे पिता, तसेच जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात असता, तेव्हा त्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी, त्याचे कौतुक करण्यासाठी तुम्हाला शिस्तीची गरज नसते. तहान भागवणे किंवा आनंद घेणे यासाठी शिस्तीची गरज नसते.
शिस्तीची गरज तेव्हा निर्माण होते, जेव्हा प्रथम एखादी गोष्ट आनंददायक नसते; पण तुम्हाला माहीत असते की काही काळाने त्या गोष्टीचे फळ मिळेल आणि ती आनंददायक होईल. जेव्हा तुम्हाला माहीत असते, की आत्ता एखादी गोष्ट जरी आनंदादायक वाटत नसेल, तरी काही काळाने आपल्याला तिच्यापासून फायदा आणि आनंद मिळेल, तेव्हा शिस्तीची गरज असते. ध्यान करण्यासाठी लवकर उठणे किंवा स्वस्थ बसणे, हे तुम्हाला आवडत नसले तरीही तुम्ही ते करता... कारण थोडीशी जाणीव असते, की यातून काहीतरी सखोल आणि शाश्वत असे मिळणार आहे.
तुम्ही ‘स्व’मध्ये स्थिर असता, तेव्हा तुम्ही शांत आणि आनंदी असता. या स्थितीमध्ये शिस्तीची गरज नसते. पण मन नकारात्मकतेने भरलेले असते, चिंतातूर, अस्थिर असते आणि तुमच्या विचारांवरचा ताबा पूर्णपणे सुटलेला असतो, तेव्हा शिस्तीची निश्चितच गरज असते. मनाच्या मर्कटलीलांना शांत करण्यासाठी शिस्त आवश्यक असते- ज्याद्वारे मन ‘स्व’मध्ये स्थिर होईल- जे सर्व आनंदाचे निधान आहे. शिस्तीचे फळ म्हणजे सुख आणि आनंद.
योग म्हणजे नियमांचे पालन... असे का म्हणतात? शिस्तीची गरज केव्हा निर्माण होते? उदाहरणार्थ- डायबेटिसचा रुग्ण साखर न खाण्याची शिस्त पाळतो, किंवा कोलेस्टेरॉल असणारी व्यक्ती तळकट पदार्थांपासून लांब राहते - कारण तिला माहीत असते की या क्षणी ते चमचमीत वाटले, तरी कालांतराने त्याचा त्रासच होणार आहे.
नियमित शिस्तीतून मिळणारा आनंद सात्त्विक आणि शाश्वत असतो. क्षणिक त्रास देणारी शिस्त पाळण्याला तुमची ना नसते कारण तुम्हाला माहीत असते, की त्यातून मिळणारा आनंद शाश्वत आहे. शिस्त म्हणजे स्वतःला विनाकारण त्रास देणे नव्हे. शिस्तीचा उद्देश शाश्वत असा आनंद मिळवणे होय. तुम्हाला असे लोकही दिसतील जे स्वतःवर शिस्त लादून घेतात, जी ना त्यांना, ना इतरांना आनंद देते. याला ‘तामसिक आनंद’ म्हणतात, जो केवळ आनंदाचा आभास असतो.
सात्त्विक आनंद सुरुवातीला तितकासा सुखदायी नसतो; पण सरतेशेवटी आनंद प्रदान करतो. आनंदाचे स्वरूप राजसिक असते, तेव्हा तुम्हाला सुरवातीला खूप छान वाटते; पण त्याचा अंत कष्ट आणि दुःखात होतो.
शिस्त कोणी तुमच्यावर लादलेली नसते, तर तुम्ही ती स्वतःहून स्वीकारलेली असते. तुम्ही लहान असताना कदाचित आईने जबरदस्तीने दात घासायला लावले असतील; पण वय वाढत जाते, तसे तुम्हाला कळते, की ते तुमच्यासाठी चांगले आहे तेव्हा ती स्वयंशिस्त बनते.
शिस्त तुमच्या अस्तित्वाचे सगळे आयाम एकसंध बनवते आणि तुम्हाला ‘स्व’ची जाणीव करून देते. तुम्ही जागे असता, तेव्हा तुम्ही भौतिक गोष्टीत व्यस्त असता. झोपेतही तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करत असता. तुम्हाला स्वची जाणीव होण्यासाठी खराखुरा विश्राम कधीच मिळत नाही. पण तुम्ही तुमच्या अस्तित्वाचे सगळे आयाम एकत्र करता, तेव्हा तुम्हाला स्वतःचा बोध होतो.
योगाचा उद्देश हाच आहे - तुम्हाला परिपूर्ण बनवणे. चला, आपण एक प्रयोग करू. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे बघता, तेव्हा स्वतःच्या डोळ्यांबद्दल सजग व्हा. मग, तुमचे मन, जे तुमच्या डोळ्यांद्वारे बघत आहे त्याबद्दल सजग व्हा. आता डोळे मिटा आणि मन पंचेंद्रियाकडून परत फिरवा आणि तुमचे पूर्ण शरीर, हृदय आणि तुमच्या अस्तित्वाचा गाभा म्हणजे तुमच्यातल्या ‘मी’बद्दल सजग व्हा.
आता सगळे सोडून देऊन केवळ विश्राम करा. ‘स्व’रूपाकडे द्रष्टा म्हणून पाहणे म्हणजे योग. हे तुमच्यासाठी नवीन नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही आनंद, कृपा, सुख किंवा परमानंदाची अनुभूती घेता तेव्हा हेच घडत असते. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा तुमचे मन शांत, स्थिर, आणि निर्विकल्प असते.