तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ३९ लाख मतदारांचे सध्या मॅपिंग सुरु आहे. त्यासाठी नेमलेले ‘बीएलओ’ प्रत्येक मतदाराचे घर तथा पत्ता, त्याच्या घरातील एकूण मतदार, याची माहिती घेत आहेत. तीनवेळा भेट देऊनही त्या पत्त्त्यावर मतदार राहत नसल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. त्यानंतर मतदारांनी हरकत नोंदविल्यास त्यावर सुनावणी होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सुनावणीवेळी पुराव्यांसह तो मतदार प्रत्यक्ष हजर न राहिल्यास त्याचे नाव मतदार यादीतून हटविले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीवेळी ३४ लाख ३४ हजार पाचशेंवर मतदार होते. आता जिल्ह्यातील मतदार ३९ लाखांवर पोचले आहेत. रोजगार तथा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते, तरीपण मागील सहा वर्षांत जिल्ह्यात पाच लाख मतदार वाढले. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. अनेकांनी यावर आक्षेप घेतले. या पार्श्वभूमीवर आता मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण (एसआयआर) केले जात आहे.
या मोहिमेअंतर्गत ‘बीएलओ’ प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. त्या मतदाराच्या कुटुंबातील मतदार २००२ सालातील यादीत होता का, हे पडताळतील. याशिवाय १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे समाविष्ठ करतील, मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे कमी (माहिती संकलित करुन त्यावर वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करतील) करण्याची कार्यवाही करणार आहेत. प्रत्येक बीएलओंनी मॅपिंगचे काम पारदर्शकपणे करायचे आहे, यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी स्पष्ट केले आहे.
‘बीएलओ’नी नेमली खासगी व्यक्ती?
सध्या मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम सुरु असून पहिल्या टप्प्यात मतदारांचे मॅपिंग (मतदाराचा पत्ता, त्यांच्या कुटुंबातील सर्व मतदार एकत्रित करणे) सुरु आहे. मॅपिंगवेळी आता जे तरुण मतदार आहेत, त्यांच्या कुटुंबियांचे २००२ सालातील मतदार यादीत नाव होते की नाही, याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी मतदारांच्या घरोघरी ‘बीएलओ’ जात आहेत. मात्र, काही ‘बीएलओं’नी मॅपिंगच्या कामासाठी आठ-दहा हजार रुपयांचे मानधन देऊन सोयीचा खासगी व्यक्ती नेमले आहेत किंवा नेमणार असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ‘एसआयआर’ची स्थिती
एकूण मतदार
३९ लाख
एकूण अंदाजे कुटुंब
९.८७ लाख
मॅपिंगसाठी ‘बीएलओ’
३,७२३
‘बीएलओ’कडील मतदार
प्रत्येकी १०००