Baramati Bypoll Sunetra Pawar: सुरुवातीला बिनविरोध होईल अशी वाटणारी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आता रंजक वळवणार पोहोचली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना सहानुभूती मिळेल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल, असा महायुतीचा (Mahayuti) अंदाज होता. मात्र, हा अंदाज सपशेल फोल ठरला असून बारामती पोटनिवडणुकीच्या (Baramati Byelection 2026) रिंगणात थोडेथोडके नव्हे तर 55 उमेदवार उतरले आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षानेही आकाश मोरे यांच्या रुपाने धनगर उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही लढाई अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. (Maharashtra Politics news)
सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वाचा शब्द दिला. बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी 6 एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची सूत्रे आपल्या हातात ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. यानंतर त्यांनी बारामतीच्या रिक्त जागेवरुन पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 55 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अभिजित बिचुकले यांचाही समावेश आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवल्याने पार्थ पवार प्रचंड संतापले होते. या संतापाच्या भरात त्यांनी, ‘ही काँग्रेसच्या डाऊनफॉलची सुरुवात आहे’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते आक्रमक झाले असून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीकेची मालिक सुरु आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा