इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हज
Marathi April 08, 2026 05:25 PM

सोने आणि चांदीचे दर: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाला वेठीला धरणारं आणि एका मोठ्या विध्वंसाच्या दिशेने वाटचाल सुरु असलेलं इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर तात्पुरते थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवर हल्ले करणार नाही, असे सांगत शस्त्रसंधीची घोषणा केली. त्याचवेळी ट्रम्प यांनी इराणकडून आलेला 10 कलमी तहाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक संकेत दिले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड धास्तावलेल्या भांडवली बाजाराने (Share Market) सुटकेचा निश्वास टाकला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होताच भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. याशिवाय, भारतीय गुंतवणुकदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला सोने (Gold price) आणि चांदीच्या (Silver price) दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे. (Gold and Silver Rate Latest Updates)

इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर बुधवारी सकाळी वायदे बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळाले. याशिवाय, स्थानिक बाजारपेठांमध्येही सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे. मंगळवारी जीएसटी वगळता सोन्याचा भाव 1,47,500 रुपये इतका होता. तो बुधवारी तीन हजार रुपयांनी वाढून 1 लाख 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात किलोपाठी 10 हजार रुपयांची वाढ पाहायला मिळाली. काल एक किलो चांदाजी भाव 2 लाख 37 हजार इतका होता. तो बुधवारी सकाळी थेट 2 लाख 47 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. इराण-अमेरिका युद्ध आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करु लागल्याने आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी उसळी पाहायला मिळू शकते, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे.

Share Market: शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री इराणची संपूर्ण लोकसंस्कृती नष्ट होईल, असा हल्ला करण्याचा इशारा दिला होता.  त्यामुळे अमेरिका-इस्रायल मंगळवारी रात्री इराणवर मोठ्या स्वरुपाचा हल्ला करतील, अशी शक्यता वाटत होती. इराणवर अणुबॉम्बचा प्रयोग होऊ शकतो, या शक्यतेने जग धास्तावले होते. तसे झाले असते तर जगभरातील भांडवली बाजारात मोठी पडझड झाली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्याने संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला. यानंतर बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली.  प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने तब्बल २७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर निफ्टी ७५० अंकांनी वधारला आहे. आयटी, मेटल, रिअॅल्टी क्षेत्रातील समभागात मोठी तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे, १३ टक्क्यांनी दर पडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव ९५ डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. अदानी पोर्ट, इंडिगोच्या समभागात मोठी उसळी पहायला मिळत आहे.

आणखी वाचा

इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.