IPL 2026: दिल्ली- गुजरात सामन्यात Fixing? त्या तीन घटनांमुळे चर्चेला उधाण
esakal April 09, 2026 06:45 PM

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात झालेला आयपीएल २०२६ स्पर्धेतील सामना नाट्यमय ठरला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर फक्त एक धावेने विजय मिळवला. त्यामुळे गुजरातने त्यांच्या तिसऱ्या सामन्यात गुणांचे खाते उघडले आहे. मात्र या रोमांचक सामन्यात काही वादग्रस्त निर्णय समोर आले आहेत, ज्यामुळे सध्या फिक्सिंगची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

या सामन्यात गुजरातने दिल्लीसमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने केएल राहुल आणि पाथुम निसंका यांच्या दमदार सलामी भागीदारीमुळे ९ षटकांपर्यंतच १ बाद ९७ धावा केल्या होत्या. पण राशिद खानने १० व्या षटकात नितीश राणा आणि समीर रिझवी यांनी लागोपाठ चेंडूवर बाद केले आणि दिल्लीला मोठे धक्के दिले. त्यामुळे डेव्हिड मिलर फलंदाजीला आला. पण मिलरच्या बोटाला दुखापत झाल्याने तो १३ व्या षटकानंतर मैदानातून बाहेर गेला.

त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीला आला. पण अक्षरही २ धावांवर बाद झाला, त्यानंतर केएल राहुल ९२ धावांवर आणि स्टब्स ७ धावांवर माघारी परतला. त्यामुळे मिलर पुन्हा मैदानात उतरला. शेवटच्या तीन षटकात दिल्लीला ४५ धावांची गरज होती. पण मिलरने आक्रमक खेळ करत समीकरण २ चेंडूत २ धावा असं केलं होतं. मात्र त्यानंतर त्याने एकेरी धाव घेतली नाही. त्यामुळे १ चेंडूत २ धावा असं समीकरण झालं. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मिलर पूल खेळताना चूकला. पण त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी कुलदीप यादव धावबाद झाला. त्यामुळे गुजरातने अवघ्या एका धावेने विजय मिळवला.

मात्र या सामन्यानंतर सोशल मिडिया युझर्सकडून या सामन्यात फिक्सिंग झाल्याची चर्चा होत आहे. काही युझर्सने तीन अशा घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे फिक्सिंगचे आरोप केले जात आहेत. यातील पहिली घटना म्हणजे १९ व्या षटकात मिलरने पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजविरुद्ध एक मोठा शॉट खेळला होता, ज्यावर पंचांनी त्याला चौकार दिला. मात्र अनेक युझर्सचं असं म्हणणं आहे की चेंडू बाऊंड्री लाईनला टप्पा न लागला. त्यामुळे तो षटकार होता, मात्र त्या चेंडूची योग्य तपासणी न करता चौकार देण्यात आला.

त्यानंतर मिलरने २ चेंडूत २ धावा असे समीकरण असताना एक धाव का घेतली नाही, असाही सवाल विचारण्यात येत आहे. कारण जर एक धाव घेतली असती, तर किमान सामना बरोबरीत झाला असता आणि निकाल सुपर ओव्हरमध्येही लागू शकला असता.

याशिवाय शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेताना कुलदीप यादवने डाईव्ह मारली होती. पण तो धावबाद होता की नाही, हे स्पष्टपणे दाखवण्यात आले नाही. पंचांनी थेट कुलदीपला बाद घोषित केले. दरम्यान, या तीन घटनांमुळे फिक्सिंगची जोरदार चर्चा होत आहे.

मात्र, अद्याप याबाबत गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स किंवा बीसीसीआयकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी या केवळ चर्चा आहेत. याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत किंवा भाष्य कोणाकडून करण्यात आलेले नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.