उपळाई बुद्रूक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२४ च्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी (ता. ८) जाहीर झाला. जिल्ह्यातील सुपुत्रांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. त्यांची विविध पदांवर निवड झाली आहे.
समर्थ राकले (अकलूज)
अकलूज (ता. माळशिरस) येथील समर्थ संजय राकले यांची सहायक राज्यकर आयुक्त या पदावर निवड झाली आहे. त्यांनी शालेय शिक्षण शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, अकलूज येथे पूर्ण केले. पुढे दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडत सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून २०२४ मध्ये ‘नगर रचना सहाय्यक’ पदावर निवड झाली होती. त्यानंतर राज्यसेवा परीक्षेतून त्यांनी सहाय्यक राज्यकर आयुक्त पद मिळवत मोठे यश संपादन केले.
काजल भोसले (फोंडशिरस)
फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील काजल बेबी विलास भोसले यांची सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण, आदिवासी विभाग) या पदावर निवड झाली आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, कुंभारमळा येथे घेतले, तर माध्यमिक शिक्षण श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस येथे पूर्ण केले. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला व जुनिअर कॉलेज, नातेपुते येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर, बारामती येथे उच्च शिक्षण घेतले. ग्रामीण पार्श्वभूमीतून येत त्यांनी सातत्याने अभ्यास करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.
सायली परांडे (अकलूज)
अकलूज येथील सायली शिवाजी परांडे यांनी सहायक राज्यकर आयुक्त पद मिळवत तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे, माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे पूर्ण केले. पुढे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे उच्च शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
सागर रणनवरे (मांडकी)
मांडकी (ता. माळशिरस) येथील सागर केशव रणनवरे यांची सहायक संचालकपदी (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) या पदावर निवड झाली आहे. त्यांनी ज्ञानसंपदा हायस्कूल, शिवाजीनगर, मुंबई येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, चेंबूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर एन. जी. आचार्य अँड डी. के. मराठे कॉलेज, मुंबई येथून बीएससी (केमिस्ट्री) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मधून एम.कॉम पदवी संपादन केली. सध्या ते जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
प्रज्ञा चौधरी (सोलापूर)
सोलापूर शहरातील प्रज्ञा चौधरी यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत मुख्याधिकारी पदावर निवड मिळवली आहे. प्रज्ञा यांचे प्राथमिक शिक्षण दयानंद प्रशालेत, माध्यमिक शिक्षण हरीभाई देवकरण प्रशालेत, तर उच्च शिक्षण वालचंद महाविद्यालयातून बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झाले. अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक क्षेत्रातून स्पर्धा परीक्षांकडे वळून त्यांनी सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. अलीकडेच त्यांची कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली होती.
अक्षय काळे (सुर्डी)
सुर्डी (ता. बार्शी) येथील अक्षय ईश्वर काळे यांनी गटविकास अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे हे त्यांचे सलग सहावे यश ठरले आहे. अक्षय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिलीपराव सोपल प्रशाला, सुर्डी येथे झाले. पुढे त्यांनी वालचंद कॉलेज, सोलापूर येथून अकरावी-बारावी पूर्ण करून सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथून बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. कुटुंबीयांचा प्रशासनातील वारसा आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला. यापूर्वीही त्यांनी कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि सहाय्यक गटविकास अधिकारी पदांवर यश मिळवले आहे.
नितीन आसबे (फळवणी)
फळवणी (ता. माळशिरस) येथील नितीन किसन आसबे यांनी सहाय्यक राज्यकर आयुक्त पदाला गवसणी घातली आहे. नितीन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले असून माध्यमिक व बारावीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत. सुरुवातीच्या अपयशानंतरही त्यांनी हार न मानता सातत्य ठेवले. २०२२ साली उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाल्यानंतरही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर त्यांची यंदा सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली आहे.
दीपाली खरात (गिरवी)
गिरवी (ता. माळशिरस) येथील दीपाली शिवाजी खरात यांनी एन टी - सी महिला प्रवर्गातून राज्यात तिसरा क्रमांक मिळवत सहायक राज्यकर आयुक्त पद मिळवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिसेवस्ती (गिरवी) येथे, माध्यमिक शिक्षण नातेपुते येथे, तर पदवी शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात बी.एससी. (स्टॅटेस्टिक्स) झाले. सध्या जलसंपदा विभागात नोकरी करत असताना अभ्यास करून त्यांनी हे यश संपादन केले आहे.
डॉ. हिमालय घोरपडे, सांगोला
सांगोला शहरातील डॉ. हिमालय घोरपडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली आहे. सध्या ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. मेडिकल शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळत २०१९ साली तहसीलदार पद मिळवले. प्रशिक्षणानंतर हिंगोली येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून सेवा बजावली होती.
रविकांत पाटील, धायटी
सांगोला तालुक्यातील धायटी येथील रविकांत चंद्रकांत पाटील यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, धायटी येथे, माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, धायटी येथे, उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर महाविद्यालयात, तर पदवी शिक्षण सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड येथे संख्याशास्त्र विषयातून पूर्ण झाले आहे.