- rat९p९.jpg-
P26O36259
राजापूर ः ओणी-अणुस्कुरा मार्गावर रायपाटण येथे नवीन छोट्या पुलाचे काम सुरू आहे.
रायपाटण येथे दीड कोटींचा नवा पूल
काम सुरू; प्रवाशांची गैरसोय टळणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः राजापूर तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटण येथील जुन्या आणि धोकादायक पुलाच्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येत आहे. सुमारे दीड कोटी रुपये खर्चून साकारला जाणारा हा नवीन पूल परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार असून, सध्या या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे.
रायपाटण येथील वीरभद्र मंदिरापासून काही अंतरावर असलेला हा पूल अत्यंत जुना झाला होता. या पुलाची काही वर्षांपूर्वी तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती; मात्र वाढती रहदारी पाहता हा मार्ग पुन्हा धोकादायक ठरू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पुलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळली जात आहे. आगामी काही दिवसांत हे बांधकाम पूर्ण होऊन हा नवा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज होईल.