मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
Tv9 Marathi April 10, 2026 08:45 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचं बोललं जात आहे. राज्यात ऑपरेशन टायगरची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे खासदारचं काय सर्व आमदार देखील आमच्या संपर्कात असतात, पहिल्यापासूनच आहेत, निवडणूक झाली तेव्हापासून आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.  ऑपरेशन टायगर केव्हा करायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. योग्य वेळेला तो निर्णय घेतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असतानाच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन टायगरबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे.

नेमंक काय म्हणाले वडेट्टीवार?   

अशी बैठक झाल्याचे मी ऐकले आहे,  मला त्या संदर्भात फारशी माहिती नाही. तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. महाराष्ट्र आणि देशात फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलेला आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काहीच राहिलेली नाही, कोणी कुठेही जावं, कुणाच्याही मांडीवर जाऊन बसावं, त्याने डोक्यावर घ्यावं आणि मग परत पायाखाली तुडवावं अशी राजकारणात आता फॅशनच झाली आहे.  देश आणि राज्य उद्ध्वस्त झालं आहे.  जनता त्रस्त आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मात्र पुढे या बैठकीसंदर्भात बोलताना त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं देखील पहायला मिळत आहे. खासदार मतदारसंघाच्या कामासाठी ही जाऊ शकतात. अखेर सत्ता त्यांच्याकडे आहे, म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिंदेंची भेटी घेऊ शकतात. आम्हीही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटत असतो. मतदारसंघाच्या कामासाठी आम्हीही जात असतो. शिंदे साहेबांकडे जेवण चांगलं असेल, म्हणून ते भेटायला गेले असतील.  यापेक्षा यावर जास्त भाष्य करणे सद्यस्थितीत उचित होणार नाही, असंही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.