हौस ऑफ बांबू : मानसीचा चित्रकार तो...
esakal April 11, 2026 09:45 AM

नअस्कार! चित्रकलेची महागडी साधनं परवडत नव्हती, म्हणून मी लेखक झालो, असं सांगणाऱ्या व्यंकटेश गजानन तथा तात्या माडगूळकरांनी लेखनातूनही काढली ती चित्रंच. जे कुंचल्यानं काढायचं, ते लेखणीनं काढलं. व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्यावर पोसलेली पिढीही आता उताराला लागलेली आहे. तरीही त्यांचं अस्सल शब्दलाघव आजही भुरळ पाडतं. अगदी नव्या पिढीलाही.

हा लेखक कुठल्या जातीपातीच्या उतरंडीत नव्हता. साहित्य प्रवाहांची लांबी रुंदी मोजणाऱ्यांपैकीही नव्हता, आणि त्यांच्या लेखणीचा आविर्भाव कोंडीफोडू कामगिरीचाही नव्हता. त्या लेखणीतून उमटली ती माणदेशातली, अन्य भागातली तऱ्हेतऱ्हेची माणसं, रानावनातली जनावरं आणि त्यांच्यासारखाच तटस्थ, शांत निसर्ग.

गेल्या आठवड्यातच व्यंकटेश माडगूळकरांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात झाली. तात्या असते तर पाच एप्रिलला शंभरीत शिरले असते. पुण्यातल्या ‘प्रभात रस्त्याला समांतर काळ्याकरंद जमिनीचा लांबरुंद तुकडा’ असलेल्या जागेत जिथं व्यंकटेश माडगूळकर राहायचे, त्या ‘अक्षर’ बंगल्याच्या जागेकडे नजर टाकली की उंच झाडं सर्वांत आधी दिसतात.

त्यापैकी काही झाडांनी तरी तात्यांना प्रत्यक्ष बघितलं असणार. या इथल्याच बंगल्यातल्या स्वतंत्र खोलीत खिडकीशी बसून तात्यांनी कालजयी शब्दचित्रं रंगवली. त्या काळी मोकळा असलेला हा भाग आता काहीच्या काहीच गुदमरलाय. माधव आचवलांसारख्या ‘किमया’गार रचनाकारानं त्यांचं घर आखून दिलं होतं. काटक्या काटक्यांनी लेखकानं ते बांधलं.

कागदावर रेघोट्या ओढणं, आणि अक्षरं काढणं, हे दोन उद्योगच मला येतात, असं म्हणणाऱ्या तात्यांच्या व्यक्तिमत्वात नैसर्गिक राजसपण होतं. उगाच नाही त्यांचे थोरले बंधू गदिमा त्यांना कौतुकानं ‘कर्नलसाहेब’ म्हणत. ज्या हातात कुंचला आणि लेखणी प्रतिभेचे नवोन्मेष दाखवायची, त्याच हातात एकेकाळी बंदूकही असे. पण कुठल्या तरी आत्मभानाच्या क्षणी कर्नलसाहेबांनी बंदूक कायमची खाली ठेवली...

माणदेशी माळरानांवर उन्हातान्हात पाखरा-लावऱ्यांच्या मागं हिंडून व्यंकटेश माडगूळकरांनी विद्या मिळवली. ‘किन्हईचे कीर्तनकार, राखणदार बळी रामोशी, आई-बाबा आणि सवंगड्यांनी गोष्ट कशी सांगावी, हे शिकवले,’ असं तात्यांनी लिहून ठेवलंय.

माडगूळकरांनी जे काही लिहून ठेवलं, ते अस्सल बावनकशी मऱ्हाटी सोनं होतं. गावगाड्यातून येणारं मराठीपण त्यात होतं. मला तर वाटतं की माय मराठीचं चित्र तात्यांकडूनच काढून घ्यायला हवं होतं. ब्रिटिश काळात अवनींद्रनाथ टागोरांनी भारतमातेचं चित्र काढलं होतं. आजही तेच चित्र आपण वापरतो. मायमराठीचं रेखाटन करण्यासाठी व्यंकटेश माडगूळकरांचाच कुंचला हवा होता.

स्वच्छ आणि ओघवतं लिहू शकणारी जी काही थोडी लेखक मंडळी होती, त्यात माडगूळकर आघाडीवर होते. किंबहुना, मराठी कथांचं दालन समृद्ध करणाऱ्या भावे, गाडगीळ, माडखोलकर आदींच्या रांगेत या माणगावच्या लेखकानं दिमाखात आपलाही पाट मांडला होता. त्यांच्या चित्रमय शैलीचा डौलच आगळा होता. त्यांच्या शब्दांत चित्रं होती, आणि चित्रांमध्ये शब्द दडलेले होते.

लेखकाच्या नशिबी असतात ते सगळे भोग, उपभोग, संकटं आणि विकार विलसितं माडगूळकरांच्याही वाट्याला आली. लिहिलं मोजकंच पण अक्षरवाङमयात समाविष्ट होणारं. ज्ञानोबा माऊलीनं म्हटलेलं हे खरं देशीकार लेणं होतं. आजचे महाराष्ट्रातले अनेक वन्यजीवअभ्यासक व्यंकटेश माडगूळकरांमुळे या क्षेत्राकडे ओढले गेले आहेत. अरण्यवाचनाचे धडे तात्यांचं बोट धरुन त्यांनी गिरवले आहेत. अशा तात्या माडगूळकरांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. हे वर्ष दणक्यात साजरं व्हायला हवं. या निमित्तानं राज्य सरकारनंही वनखातं, सांस्कृतिक खातं आणि मराठी भाषा विभागाला कामाला लावून एक निराळा अध्याय सुरु करायला काय हरकत आहे?

...लेखक होता, भुईमुगाच्या शेंगेसारखा. अंगभर माती लपेटून आलेला. ती माती मराठी आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.