तारापूर एमआयडीसीत धुळीचा त्रास; पाणी फवारणी बंद
बोईसर, ता. १२ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्तेकामांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे संपूर्ण परिसर अक्षरशः प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. खराब रस्ते, उखडलेली माती आणि अवजड वाहनांची सततची वर्दळ यामुळे हवेत धुळीचे ढग निर्माण होत असून, कामगार व नागरिकांचे जगणे त्रासदायक झाले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार काही दिवस टँकरद्वारे पाणीफवारणी करण्यात येत होती; मात्र ती अचानक बंद झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. परिणामी रोज हजारो कामगार व प्रवासी धुळीच्या प्रदूषणात प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. धुळीमुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार, ॲलर्जी यासारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत धुळीचा त्रास असह्य होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ही समस्या बिकट बनत चालल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने पाणी फवारणी पुन्हा सुरू करून रस्त्यांची कामे पूर्ण करावीत अन्यथा आंदोलनचा करण्याचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.