Pakistani Celebrities Pay Heartfelt Tribute to Asha Bhosle: गायिका आशा भोसलेंच्या (Asha Bhosle) निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या सुमधूर आवाजानं प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. लहानमुलांपासून, तरुणाई आणि ज्येष्ठ व्यक्ती आशा ताईंची गाणी (Music Industry) आवडीने ऐकतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व वयोगटातील लोकांच्या मनावर आणि ह्रदयावर राज्य केलं आहे. आशा ताई केवळ भारतीयांच्याच लाडक्या नव्हत्या तर, संपूर्ण जगात त्यांचे चाहते आहेत. विशेष म्हणजे, सीमेपलीकडील पाकिस्तानातही त्यांच्या गायनाचे अनेक चाहते आहेत. म्हणूनच आशा भोसले यांच्या निधनाने केवळ भारतावरच नाही तर, पाकिस्तानावरही शोककळा पसरली आहे.
आशा भोसले यांच्या निधनानंतर पाकिस्तानी लोकांनीही दु:ख व्यक्त केलंय. अनेक प्रमुख पाकिस्तानी सिनेसृ्ष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर एकत्र येऊन आपले दु:ख व्यक्त केले आहे. तसेच आशाताईंना श्रध्दांजली वाहिली आहे. गायक अभिनेता अली जफरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर आशा भोसले यांचा फोटो शेअर करुन दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, 'आशा भोसले यांचं कार्य येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिल. असे आवाज काळाबरोबर पुसले जात नाहीत, उलट ते काळाचाच एक भाग बनतात', असं अली जफर म्हणाला.
अलि जफर व्यतिरिक्त अदनान सिद्दीकी, अॅक्टर यासिर हुसैन, अहमद अली बट यांसारख्या दिग्गज पाकिस्तानी कलाकारांनी आशा ताईंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ' एका युगाचा अंत झाला' असं म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अहमद अली बटने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर, 'तुमच्या अजरामर गाण्यांसाठी धन्यवाद', असं म्हणत आदरांजली वाहिली आहे. तसेच अदनान सिद्दीकीनेही आशा भोसलेंच्या निधनानंतर पोस्ट शेअर केली आहे. 'आशा भोसलेंना श्रध्दांजली. रात अकेली है.. तुमच्या आवाजात अशी जादू होती की, अगदी एकाकी क्षणांनाही भरुन टाकायचे. आज तीच शांतता जड वाटत आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या भावनांबद्दल धन्यवाद. तुम्ही स्वत: एक सुंदर आठवण बनला आहात आणि तुम्ही मागे सोडलेली जादू कायम राहिल', असं अदनानने म्हटलं आहे.
गायक शुजा हैदरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'त्यांचा आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी आपल्या आवाजातून लाखो चाहत्यांना प्रेरणा दिली आहे. जगातील महान संगीतकारांमध्ये त्यांची आठवण कायम ठेवली जाईल', असं गायक म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: