होर्मुझची नाकेबंदी होताच भारताला सर्वात मोठी खुशखबर; थेट तेहरानमधून… तेलाचं टेन्शनच मिटलं!
GH News April 13, 2026 06:14 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पु्न्हा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्याला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका भारतासह जगभरातील देशांना बसण्याची शक्यता आहे. अशातच आता या संकटाच्या काळात भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे सात वर्षांनंतर इराणचे कच्चे तेल पुन्हा भारतात दाखल झाले आहे. शिप ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार दोन मोठे सुपरटँकर भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर पोहोचले आहेत, त्यामुळे भारताची तेलाची समस्या काही दिवसांसाठी मिटणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, फेलिसिटी नावाचा एक मोठा क्रूड कॅरियर रविवारी उशिरा रात्री गुजरातमधील सिका किनाऱ्याजवळ पोहोचला. नॅशनल इराणियन टँकर कंपनीद्वारे ऑपरेट केला जाणाऱ्या या टँकरमध्ये सुमारे 20 लाख बॅरल कच्चे तेल आहे. हे तेल मार्चच्या मध्यात खार्ग बेटावरून लोड करण्यात आले होते. दुसरा जया नावाचा टँकर ओडिशातील पारादीप किनाऱ्याजवळ पोहोचला असून त्यातही 20 लाख बॅरल कच्चे तेल आहे. हे तेल फेब्रुवारीच्या अखेरीस खार्ग बेटावरून लोड करण्यात आले होते. त्यामुळे आता काही दिवसांसाठी भारतातील तेलाची चिंता मिटली आहे.

हे तेल कुणी विकत घेतले?

भारतात पोहोचलेल्या दोन्ही टँकरमधील तेल नेमकं कोणत्या कंपनीने खरेदी केले याबाबत माहिती समजू शकलेली नाही. पारादीप बंदर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चालवते, त्यामुळे या कंपनीने हे तेल खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सिका क्षेत्र रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे महत्त्वाचे क्रूड हँडलिंग केंद्र आहे, त्यामुळे हे तेल या कंपन्यांनी खरेदी केले असल्याची माहिती समोर आली आहे.

सात वर्षांनंतर इराणी तेल भारतात

सुमारे सात वर्षांनंतर इराणी तेल भारतात दाखल झाले आहे. अमेरिकेने गेल्या महिन्यात काही अटींसह इराणी तेलावरील निर्बंध हटवले होते. त्यामुळे इराणी तेल विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्यानंतर भारताकडून या तेलाची खरेदी करण्यात आली होती. यापूर्वी भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत होता. 2018 मध्ये भारताने दररोज सुमारे 5.18 लाख बॅरल इराणी तेल आयात केले होते, जे जानेवारी ते मे 2019 दरम्यान कमी होऊन 2.68 लाख बॅरल प्रतिदिन झाले. त्यानंतर मे 2019 पासून आयात पूर्णपणे बंद झाली होती. त्यानंतर आता 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा इराणी तेल भारतात दाखल झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.